औरंगाबाद : सकल जैन समाजांतर्गत भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समितीच्या वतीने मंगळवार, १९ एप्रिल रोजी शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या शोभायात्रेत दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेता ‘पाणी वाचवा’ संदेश देणारे देखावे असतील. शिवाय गोशाळा, चारा छावण्यांना देण्यासाठी चाऱ्याने भरलेले २४ ट्रकही सहभागी होणार आहेत, अशी माहिती समितीचे अध्यक्ष मदनलाल आच्छा यांनी दिली. यासंदर्भात आयोजित पत्रपरिषदेत त्यांनी सांगितले की, सकल जैन समाज एकत्र येऊन औरंगाबादेत महावीर जन्मकल्याणक महोत्सव साजरा केला जातो. या महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे शहरात निघणारी भव्य शोभायात्रा होय. या शोभायात्रेमुळेच येथील सकल जैन समाजाचे नाव देशभर प्रसिद्ध झाले आहे. १९ एप्रिल रोजी पहाटे शहराच्या विविध भागांतून वाहन रॅली निघणार आहे. ही रॅली महावीर चौकात पोहोचणार आहे. सकाळी ७ वाजता येथील भगवान महावीर कीर्ती स्तंभ येथे सकल जैन समाजाचे अध्यक्ष राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण होणार आहे. यावेळी कार्याध्यक्ष आ.सुभाष झांबड, महासचिव महावीर पाटणी, तसेच महोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी व समाजबांधव हजर राहणार आहेत. यानंतर सकाळी ७.३० वाजता उस्मानपुरा येथील उत्तमचंद ठोले दिगंबर जैन छात्रालय व गुरुगणेशनगर येथे ७.४५ वाजता धर्मध्वजारोहण करण्यात येणार आहे. कार्याध्यक्ष वृषभ कासलीवाल यांनी सांगितले की, मुख्य शोभायात्रा सकाळी ८ वाजता पैठणगेट परिसरातून निघणार आहे. चित्ररथात यंदा ‘पाणी बचाव’ ,‘ बेटी बचाव’ व पशुधन बचाव, या विषयांवर आधारित सर्व सजीव, निर्जीव देखावे असणार आहेत. शोभायात्रा टिळकपथ, गुलमंडी, मछली खडक, सिटीचौक, सराफा रोडमार्गे शहागंजमधील गांधी पुतळा परिसरात पोहोचणार आहे.शहरातील विविध भागांत असणाऱ्या जैन मंदिरांतून निघालेल्या पालख्या शोभायात्रेत सहभागी होणार आहेत. विनोद बोकडिया यांनी सांगितले की, शोभायात्रा संपल्यावर औरंगपुऱ्यातील जिल्हा परिषद मैदानावर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. येथे आयोजित कार्यक्रमात ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, त्यांच्या पत्नीला शिवणयंत्रे, मुला-मुलीला सायकल देण्यात येणार आहे. तसेच मैदानात रक्तदान शिबीर घेण्यात येणार आहे. शोभायात्रेत समाजबांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मिठालाल कांकरिया यांनी केले. यावेळी अॅड. डी. बी. कासलीवाल, डॉ. शांतीलाल संचेती, रवी मुगदिया, विलास साहुजी, संजय संचेती आदींची उपस्थिती होती.
महावीर जयंतीनिमित्त १९ रोजी शोभायात्रा
By admin | Updated: April 17, 2016 01:31 IST