जाफराबाद : श्री गौरीशंकर महादेव मंदिर व संत जनार्दन स्वामी महाराज गोसेवा आश्रम, गोंधनखेडा येथे सुरू असलेल्या शिवपंचायतन यज्ञ भव्य जपानुष्ठान सोहळ्याची बुधवारी सांगता होणार आहे. या सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना पूरणपोळीचा महाप्रसाद देण्यात येणार आहे. संत जनार्दन स्वामी महाराज यांच्या स्मृती सोहळ्यानिमित्त दर वर्षी आश्रमात कार्यक्रम घेण्यात येऊन गुरूचरित्र पारायण, सामूहिक जपानुष्ठान, महिलांकडून देवी देवतांचे पूजन आदी कार्यक्र म सुरू आहेत. शिवपंचायतन आणि जपनुष्ठान सोहळ्याची सुरूवात शिवस्वरूप नारायणदेव बाबा वाकी, प.पू. मधवगिरी महाराज यांच्या उपस्थितीत झाली. सप्ताहात भजन, प्रवचन, कीर्तन, गणपती, देवी, गोपालकृष्ण, सूर्यनारायण, महामृत्युंजय, विठ्ठल रूखमाई पूजन तसेच गुरु नामजप आदी कार्यक्र म सुरु आहेत. दरम्यान राष्ट्र संत जनार्दन स्वामी संप्रदायातील महाराष्ट्रातील आमंत्रित साधू संतांनी भेट देऊन मार्गदर्शन करण्यात येत आहे. जाफराबाद येथून जवळच असलेल्या जालना रोड, गोंधनखेडा सावंगी शिवारात आश्रम उभा आहे. गेल्या दहा वर्षांपासून नित्य नियमाने भाविक भक्तांसाठी ही मोठी पर्वणी असून, भक्तांचे श्रध्दास्थान बनले आहे. दरवर्षी या ठिकाणी जवळपास एक हजार भाविक जप व पूजनासाठी बसत असतात. यंदा मोठ्या प्रमाणात भाविक जपानुष्ठान करीत आहेत. प.पू. महेशगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली या आश्रमाची वाटचाल सुरु आहे. बुधवारी पूरणपोळीच्या महाप्रसादाचा लाभ पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन प.पू. महेशगिरी महाराज यांनी केले आहे. (वार्ताहर)
शिवपंचायतन यज्ञ व जपनुष्ठान सोहळा
By admin | Updated: February 6, 2017 23:48 IST