शिवजनसंपर्क : चारही मतदारसंघांत संघटन बांधणीची चाचपणी
औरंगाबाद : कोरोना संसर्गामुळे महापालिकेच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. निवडणुका केव्हा होतील हे आताच सांगणे अवघड आहे. निवडणुका नसणे आणि कोरोना संसर्ग परिस्थितीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांची संघटन घडी सैल होऊ नये, यासाठी शहरातील तीनही मतदार संघांसह फुलंब्री विधानसभा मतदारसंघात शिवसेनेने संघटन बांधणीच्या अनुषंगाने बैठका सुरू केल्या आहेत.
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे हे सर्व बैठकांत शिवसैनिकांनी नागरिकांशी सतत संपर्क ठेवून अडचणी सोडवण्यासाठी तत्पर राहण्याचे आवाहन करीत आहेत. मागील दीड वर्षांत शिवसैनिकांनी चांगले काम केले असून , यापुढेही सक्षमपणे काम करण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन केले. पूर्व विधानसभा मतदारसंघात मंगळवारी शिवजनसंपर्क अभियान पुंडलिकनगर व सिडको येथे पार पडले. सर्वसामान्यांना न्याय देण्याची भूमिका शिवसेनेची आहे, त्यामुळे संकटात शिवसेना मदतीला अग्रेसर असते. त्यामुळे शहरात शिवसेनेचा जनाधार पहिला क्रमांकावर असल्याचा दावा खैरे यांनी केला.
यावेळी सहसंपर्कप्रमुख त्र्यंबक तुपे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ, विधानसभा संघटक राजू वैद्य, उपजिल्हाप्रमुख संतोष जेजुरकर, शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी, उपशहर प्रमुख मकरंद कुलकर्णी, सुरेश कर्डीले, संतोष खेंडके, शिवा लुंगारे, जयसिंग होलिये, सुर्यकांत जायभाये, आत्माराम पवार, गजानन मनगटे, मीना गायके आदींची बैठकीला उपस्थिती होती.