औरंगाबाद : महापालिकेच्या निवडणुकांसाठी ११३ वॉर्डांची रचना नैसर्गिक सीमा ओलांडून तयार करण्यात आली आहे. त्यातील २७ वॉर्डांच्या सीमा डी. पी. रोड, नद्या, नाले ओलांडून केल्या आहेत. यामध्ये निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे ११३ वॉर्डांची सोडत रद्द करून नव्याने घेण्याची मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आज मनपा आयुक्त पी. एम. महाजन यांच्याकडे केली. याप्रकरणी जैस्वाल म्हणाले, मनपाने निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली कामच केले नाही. २००१ च्या जनगणनेनुसार वॉर्ड रचना होऊन ९९ वॉर्ड झाले. त्या आधारे मनपाने २०१५ च्या निवडणुकीसाठी काम करणे गरजेचे होते. निवडणूक आयोग, विभागीय आयुक्तांना मनपाने टाकलेले आरक्षण रद्द करण्याची मागणी करण्यात येईल. उस्मानपुऱ्यासारखा ऐतिहासिक लढत म्हणून ओळखला जाणारा वॉर्डच नकाशातून गायब झाला आहे. वॉर्डाचे चार तुकडे चार वॉर्डांना जोडले गेले आहेत. तसाच प्रकार सिल्लेखाना, चिकलठाणा, कोकणवाडी, समर्थनगर, समतानगर या वॉर्डांबाबत झाला आहे. गारखेडा परिसरात वाढलेल्या तीन वॉर्डांच्या सीमा डी. पी. रोडला मध्ये घेऊन टाकण्यात आल्या आहेत. शिष्टमंडळात जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, किशोर नागरे, वीरभद्र गादगे आदींची उपस्थिती होती. भाजपाचे आयोगाला निवेदनभाजपाचे नगरसेवक मधुकर सावंत यांनी विभागीय आयुक्त आणि निवडणूक आयोग आयुक्तांना निवेदन देऊन मनपा निवडणुकीसाठी टाकण्यात आलेले आरक्षण रद्द करण्याची मागणी केली आहे. रमानगर वॉर्ड क्र.७३ हा अनुसूचित जाती नागरिकबहुल भाग आहे. परंतु तो महिला ओबीसी प्रवर्गासाठी राखीव झाला आहे. राखीव करण्यामागे राजकीय षड्यंत्र असल्याचा आरोप सावंत यांनी पत्रकार परिषदेत केला. मनपा निवडणुकीसाठी घेण्यात आलेल्या सोडतीमध्ये ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित झालेल्या वॉर्डांवरून संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. मनपाकडे सोडतीवरून मोठ्या प्रमाणात हरकती व सूचनांचा वर्षाव होण्याची शक्यता आहे. आज दिवसभरात सर्व प्रभाग कार्यालयांमध्ये नागरिकांनी सूचना व हरकतींची माहिती घेण्यासाठी गर्दी केली होती. परंतु ११ फेबु्रवारीपासून हरकती घेण्यात येणार असल्यामुळे आज मनपाने कुणाच्याही हरकती घेतल्या नाहीत.
महापालिका वॉर्ड रचनेच्या विरोधात शिवसेना जाणार कोर्टात
By admin | Updated: February 10, 2015 00:32 IST