शेख महेमूद तमीज , वाळूज ऐतिहासिक भांगसीमाता गडाशेजारी निसर्गरम्य परिसरातील शरणापूरचे श्री साईबाबा मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान बनले असून, या मंदिरात वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. प्रतिशिर्डी म्हणून शरणापूरच्या साई मंदिराची ख्याती सर्वदूर पसरत चालली आहे. राज्यभरातील साईभक्त दर्शनासाठी गर्दी करीत आहेत.मनात श्रद्धा व इच्छा असूनही शिर्डीतील साई दर्शनाचा योग जुळून येत नसल्यामुळे साईबाबांचे निस्सीम भक्त असलेले शहरातील प्रसिद्ध उद्योजक व बांधकाम व्यावसायिक राजेंद्र आदमाने पाटील यांनी शरणापूर येथील भांगसीमाता गडाजवळ निसर्गाच्या सान्निध्यात श्री साईबाबांचे मंदिर उभारण्याचा संकल्प केला होता. साईभक्तांच्या उपस्थितीत ११ जानेवारी २००१ रोजी मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले. स्वखर्चाने मंदिराची उभारणीडोंगररांगा, वनराईने नटलेला निसर्गरम्य परिसर असणाऱ्या शरणापूरच्या भांगसीमाता गडाजवळ २० हजार चौरस फूट जागेत बांधकाम करून राजेंद्र आदमाने यांनी २० आॅक्टोबर २०११ रोजी भव्य-दिव्य साई मंदिर उभारले आहे. ४० बाय ८५ या आकाराचा सभामंडप, १५ बाय १५ चा गाभारा तयार करण्यात आला आहे. राजस्थानातील जयपूर येथून उच्च प्रतीचे शिल्प आणून साडेपाच फुटांची आकर्षक अशी तेजोमय साईबाबाची मूर्ती तयार करण्यात आली आहे. प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर गेल्या पाच वर्षांपासून औरंगाबाद, पुणे, जालना तसेच राज्यभरातील विविध भागातून साईभक्त साईच्या चरणी लीन होण्यासाठी गर्दी करीत असतात. शिर्डीप्रमाणेच शरणापूरच्या साई मंदिराची ख्याती आता दूरपर्यंत पसरत चालली असून, श्रद्धा व सबुरीची शिकवण देणाऱ्या श्री साईबाबाच्या दर्शनासाठी बाराही महिने साईभक्तांची अलोट गर्दी होत आहे.
प्रतिशिर्डी म्हणून शरणापूरची ख्याती
By admin | Updated: October 16, 2016 01:13 IST