येडशी : शेतजमीन वाटणीच्या कारणावरून झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या एका शेतकऱ्याचा उस्मानाबादेतील खासगी रूग्णालयात उपचारादरम्यान सोमवारी सकाळी मृत्यू झाला़ या प्रकरणी मयताच्या भावाविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उस्मानाबाद तालुक्यातील येडशी येथील तानाजी सुभाष शेळके व त्यांच्या पत्नी रागिनी शेळके हे दोघे ८ एप्रिल रोजी सायंकाळी शेतात काम करीत होते़ त्यावेळी तानाजी यांचा भाऊ दिगांबर सुभाष शेळके हा तेथे आला़ त्या दोघांना ‘तुम्ही शेतात काम करू नका, काम बंद करा’ असे म्हणून शिवीगाळ करू लागला़ त्यामुळे ते दोघे काम बंद करून बैलगाडीने येडशी येथील घरी आले़ घरी आल्यानंतर तानाजी शेळके हे जनावरे दावणीला बांधत होते़ यावेळी दिगांबर हा शेतीच्या वाटणीवरून त्याचे वडिल सुभाष शेळके यांना शिवीगाळ करून मारहाण करीत होता़ तेव्हा तानाजी शेळके यांनी भांडण सोडवून वडिलांना का मारहाण करतोस असा जाब विचारला़ त्यानंतर तानाजी शेळके हे अंगणातील दावणीला जनावरे बांधत होते़ त्यावेळी दिगांबर सुभाष शेळके याने हातात टिकावाचा लाकडी दांड्याने तानाजी यांच्या डोक्यात जबर वार केला़ डोक्यात जबर वार झाल्याने तानाजी शेळके हे तेथेच चक्कर येऊन पडले़ तेथील नागरिकांनी त्यांना तत्काळ उपचारासाठी उस्मानाबाद येथील खासगी रूग्णालयात दाखल केले होते़ मात्र, उपचार सुरू असताना सोमवारी तानाजी शेळके यांचा मृत्यू झाला़ दरम्यान, घटनेनंतर रागिनी शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिगांबर शिंदे याच्याविरूध्द ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ तर तानाजी शेळके यांचा मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणात भादंवि ३०२ हे कलम वाढविण्यात आले आहे़ दरम्यान, शेतजमिनीच्या वादातून भावानेच भावाचा खून केल्याच्या घटनेने येडशीसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे़ (वार्ताहर)
गंभीर जखमी शेतकऱ्याचा मृत्यू
By admin | Updated: April 11, 2017 00:04 IST