धर्माबाद : येथील तहसील कार्यालयाची इमारत खूपच छोटी असून कार्यालयातील विविध विभागातील दप्तरे, आलमारी, संगणक, झेरॉक्स मशीन आदी फाईली ठेवण्यास व अधिकारी-कर्मचाऱ्यांना कामे करण्यास अनेक अडचणी निर्माण होत आहेत़ तालुका होवून १५ वर्षे उलटली तरी १० बाय १० या सहा खोल्यांत ५६ गावांचा कारभार चालत आहे़ नवीन तहसील इमारतीला कधी मुहूर्त निघेल, याकडे लक्ष आहे़कोणता विभाग कुठे आहे हे समजत नाही़ एवढेच नसून कोणती फाईल कुठे आहे हेही समजत नाही़ अधिकारी-कर्मचारी यांचे विविध विभागाचे फाईल, आलमारी, संगणक, दप्तरे, खुर्ची, टेबलसुद्धा ठेवण्यास जागा नाही़ येथे एक तहसीलदार, तीन नायब तहसीलदार कार्यरत असून बैठक घेण्यासही जागा नाही़ नायब तहसीलदार यांना स्पेशल कक्ष नसून कर्मचाऱ्यांसोबत एका टेबलावर काम करावे लागते़ कर्मचारी कोण, अधिकारी कोण हे नवीन आलेल्या व्यक्तीस समजू शकत नाही़ १० बाय १०च्या खोलीत एक नायब तहसीलदार, तीन-चार कर्मचारी, त्यांचे टेबल-खुर्ची व आलमारी, फाईली ठेवण्यास अडचण होत आहे़ येणाऱ्या नागरिकांच्या समस्या असेल तर त्यास उभे राहूनच समस्या मांडाव्या लागतात़ तहसील कार्यालयात आलमारी, दप्तरे, फाईली खचाखच भरून असल्याने खोलीतही अस्वच्छता दिसून येते़ त्याच धुराड्यात काम करावे लागते़ कार्यालयात शौचालयाची व्यवस्था नसून महिलांना याचा त्रास होत आहे़ पाणी व्यवस्थाही नाही़ बाहेरून पाणी आणून अधिकारी-कर्मचारी आपली तहान भागवतात़ संगणक ठेवण्यासही अपुरी जागा आहे़ तलाठी, कर्मचाऱ्यांची बैठक घ्यावयाची असेल तर वाचनालयात घ्यावी लागते़ कधी-कधी १० बाय १० खोलीत चार-पाच खुर्च्या टाकून बाकीचे दरवाजाच्या बाहेर बसून बैठकी उरकली जाते़ लोकशाही दिन, तक्रार दिन या दिवशी बसण्यास जागा कमी पडते़ कमी जागेमुळे अनेक अडचणी निर्माण होतात़ तहसील कार्यालयासमोर पटांगणात पावसाळ्यात पाणी साचून चिखल पसरतो़ ये-जा करणाऱ्यांस त्रास होतो़ तालुका होवून १५ वर्षे उलटले तरीही या कार्यालयाच्या समस्या सुटत नाहीत़ नवीन तहसील कार्यालयाची इमारत मालगुजाीर तलावात शहरालगत बांधण्यात आली़ पण रस्ता नसल्याने रेंगाळत पडली आहे़ नवीन तहसील कधी कार्यान्वित होईल, कधी मुहूर्त मिळेल, याकडे लक्ष लागून आहे़ (वार्ताहर)
तहसीलला समस्यांचा विळखा
By admin | Updated: September 11, 2014 00:24 IST