औरंगाबाद : कोरोना रुग्णासाठी आवश्यक असणारा ऑक्सिजनचा पुरवठा शहरात संकटात सापडला असून, ‘ऑक्सिजन संपले, अन्य रुग्णालयात रुग्णाला हलवायचे असल्यास हलवू शकता’ अशा सूचनाच रुग्णालयांकडून दिल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
शहरातील मेडिकव्हर हाॅस्पिटलने रुग्णांना याप्रकारची सूचना दिली आहे, तर दुसरीकडे वाळूज महानगर परिसरात ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने खासगी रुग्णालयांतील डॉक्टरांनी रुग्णांना डिस्चार्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रुग्णांना कुठे दाखल करावे, असा प्रश्न नातेवाईकांना पडला आहे. मेडिकव्हर हाॅस्पिटलने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना दिलेल्या सूचनेत म्हटले आहे की, सद्यस्थिती पाहता, शहरामध्ये ऑक्सिजनचा तुटवडा असून हाॅस्पिटलमध्ये मिळणारा पुरवठा देखील वेळेवर नाही. तरीही हाॅस्पिटल प्रशासन वेळेवर पुरवठा होण्याकरिता संपूर्ण प्रयत्न करत आहे. परंतु काही अपरिहार्य कारणास्तव ऑक्सिजन पुरवठा कधीही बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ज्या रुग्णांना ऑक्सिजन, नेझल, एनआयव्ही, व्हेंटिलेटर सुरू आहे, त्यांना इतर रुग्णालयात उपचारासाठी हलवू शकता. वरील सर्व बाबींची कल्पना प्रशासन आपल्याला देत आहे. त्यासाठी रुग्णालय प्रशासन जबाबदार राहणार नाही.
वाळूज उद्योग नगरीत बिकट स्थितीवाळूज उद्योग नगरीत जवळपास १० खासगी रुग्णालयांत कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. मात्र आता ऑक्सिजनचा पुरवठा बंद झाल्यामुळे डॉक्टरांनी रुग्णांना बळजबरीने डिस्चार्ज करण्यासाठी दबाव वाढविण्यास सुरुवात केली आहे. दुसऱ्या शासकीय व खासगी रुग्णालयांतही बेड शिल्लक नसल्याचे कारण दिले जात असल्यामुळे रुग्णांचे नातेवाईक हवालदिल बनले आहेत. उपचारासाठी आगाऊ रक्कम भरूनही रुग्णालयाकडून बळजबरीने डिस्चार्ज केले जात असल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. बजाजनगरातील अष्टविनायक रुग्णालयाच्या कोविड सेंटरमधून दिवसभरात ऑक्सिजन नसल्याने ७ ते ८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती मिळाली. डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांत बजाजनगरातील एका ५० वर्षीय महिलेचा समावेश असून तिला नातेवाईकांनी सिडको वाळूज महानगरातील अन्य दुसऱ्या खासगी रुग्णालयात दाखल केल्याचे नातेवाईकांनी सांगितले. याचबरोबर वैजापूर तालुक्यातील जिरी गावातील एक पुरुष रुग्ण व वसुसायगाव येथील एका महिला रुग्णालाही दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. काही खासगी डॉक्टरांशी संपर्क केला असता, एजन्सीकडून ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध होत नसल्याने नाइलाजास्तव डिस्चार्ज दिला जात असल्याचे, नाव न छापण्याच्या अटीवर त्यांनी सांगितले.
कोणाला बाहेर जाण्याचे सांगितले नाहीऑक्सिजनचा पुरवठा विस्कळीत बनला आहे. त्यातून काही परिस्थिती उद्भवू शकते. त्यादृष्टीने रुग्णांना कल्पना दिली आहे. कोणत्याही रुग्णाला बाहेर जाण्याचे सांगितले नाही.- डाॅ. संतोष यादव, मेडिकव्हर हाॅस्पिटल