हिंगोली : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ सप्टेंबरमध्ये संपत आहे. नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी शासनाने काढलेल्या आदेशाप्रमाणे जिल्हा प्रशासनाने कार्यक्रम जाहीर केला आहे.जि.प.अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड २१ सप्टेंबर रोजी होणार आहे. तर पंचायत समिती सभापतीपदासाठी १४ सप्टेंबर रोजी निवड प्रक्रिया होणार आहे. हिंगोली येथील जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलेसाठी राखीव आहे. शिवसेनेला येथे स्पष्ट बहुमत आहे. पक्षीय बलाबल विचारात घेतले तर शिवसेना-२७, राष्ट्रवादी कॉंग्रेस-१0, कॉंग्रेस-९, अपक्ष-४ अशी स्थिती आहे. त्यातही तीन अपक्ष कॉंग्रेस-राकॉंकडेच झुकलेले आहेत. मात्र तरीही सेनेला कोणाच्याही कुबड्या न घेता सत्तास्थापना करता आली होती. विद्यमान पदाधिकाऱ्यांमध्ये सर्वच शिवसेनेचे सदस्य आहेत. आगामी काळात काही राजकीय घडामोडी घडून सत्तेच्या सारिपाटावर वेगळे बदल पहायला मिळतील, अशी आशा धुसर आहे. मात्र गटातटाच्या राजकारणाची किनार लाभल्यास तसे काही घडल्यास नवल वाटण्याचेही कारण नाही. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसही त्यासाठी नकार देईल, अशी स्थिती नाही. यापूर्वी जि.प.त तसा प्रयोगही झालेला आहे. सेनेने कधी राकॉं तर कधी कॉंग्रेसशी सोबत करून सत्तेची फळे चाखलेली आहेत. त्यात आता पूर्ण बहुमत असल्याने शिवसेनेस कोणालाही सोबत घेण्याची गरज नसली तरी गटातटातील पराकोटीचा संघर्ष वेगळी वाट निवडायला भाग पाडू शकतो.पंचायत समित्यांच्या पदाधिकाऱ्यांची निवडही वेळेवरच म्हणजे १४ सप्टेंबर रोजी होणार आहे. कळमनुरी येथे अनुसूचित जाती महिला, हिंगोलीत नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, वसमतमध्ये सर्वसाधारण महिला तर औंढा व सेनगावमध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी सभापतीपदाचे आरक्षण आहे. त्यामुळे पंचायत समित्यांतही आपापल्या स्तरावर मोर्चेबांधणीची प्रक्रिया पं.स. सदस्यांनी सुरू केली आहे.मागील काही दिवसांपासून आचारसंहितेमुळे विद्यमान पदाधिकाऱ्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ मिळेल, अशी चर्चा होत होती. शिवाय काहीजण प्रशासक येईल, अशी चर्चा करीत होते. मात्र शासनाने वेळेपूर्वीच ही याबाबत आदेश काढून या सर्व तर्कवितर्कांना पूर्णविराम दिला आहे. अचानक झालेल्या या घोषणेनंतर आज जि.प. सदस्यांनी आपापल्या पक्षातील गटांना तसेच पक्षश्रेष्ठींना गळ घालण्यास प्रारंभ केला आहे. याचदरम्यान विधानसभा निवडणुकाही येत असल्याने त्याचाही या निवडणुकीवर परिणाम होईल, अशी चिन्हे आहेत. काही नाराज व विधानसभा इच्छुकांना या माध्यमातून खूष करण्याची संधी आहे. तसेच यात कोणाची नाराजी झाल्यास ती अंगाकडेही येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सप्टेंबरमध्येच जि.प., पं.स. पदाधिकारी निवड
By admin | Updated: August 27, 2014 23:38 IST