कोलकाता : तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व पश्चिम बंगालचे परिवहनमंत्री सुवेन्दु अधिकारी यांनी पक्ष नेतृत्वाशी मतभेद झाल्यानंतर पदाचा राजीनामा दिला. बहुचर्चित नंदिग्राम आंदोलनात आघाडीवर राहिलेले अधिकारी यांनी २०११मध्ये ममता बॅनर्जी यांना सत्तेत आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
अधिकारी यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांना फॅक्सद्वारे तर राज्यपालांना ई-मेलद्वारे पाठविला आहे. आपल्या राजीनामा पत्रात ते म्हणतात की, मी मंत्रिपदाचा राजीनामा देत आहे. तो तत्काळ स्वीकारण्याची कारवाई करावी. मी राज्यपालांनाही राजीनामा पाठवत आहे व तो स्वीकारण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत, अशी विनंती करीत आहे. राज्याची सेवा करण्यासाठी संधी दिलीत त्याबद्दल मी आपला आभारी आहे. मी ही सेवा पूर्णपणे प्रामाणिकपणे केली आहे.
अधिकारी यांनी मंत्रिपदाबरोबरच हल्दिया विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदाचाही राजीनामा दिला. बुधवारी त्यांनी हुगळी रिव्हर ब्रिज कमिशनर्सच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.
राज्यपालांनी ट्वीटद्वारे म्हटले आहे की, आज दुपारी १.०५ वाजता अधिकारी यांचा राजीनामा प्राप्त झाला. तो मुख्यमंत्र्यांना उद्देशून लिहिलेला आहे व मलाही पाठविण्यात आला आहे. या मुद्द्यावर संवैधानिक दृष्टिकोनातून निर्णय घेतला जाईल.
भाजपने या राजीनाम्याबद्दल म्हटले आहे की, हा राजीनामा तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांमध्ये नेतृत्वाबद्दल असलेला असंतोष दर्शवितो. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी अधिकारी हे भाजपमध्ये सहभागी होण्याच्या शक्यतेवर काहीही बोलण्यास नकार दिला.
भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी म्हटले आहे की, अधिकारी यांचा राजीनामा हा तृणमूलच्या शेवटाचा इशारा देत आहे. त्या पक्षात असे अनेक नेते आहेत, जे पक्ष चालविण्याच्या पद्धतीवर नाखुश आहेत. आमचे दरवाजे खुले आहेत.
अधिकारी हे मागील अनेक महिन्यांपासून मंत्रिमंडळाच्या बैठकांत सहभागी होत नव्हते. खा. सौगत राय व सुदीप बंदोपाध्याय यांना त्यांच्याशी बोलण्याची व समस्या सोडविण्याची जबाबादारी सोपविण्यात आली होती. अधिकारी हे वारंवार राज्याचा दौरा करीत असताना समर्थकांच्या रॅलीमध्ये सामील होत आहेत. मात्र, हे सर्व करताना ते पक्षाच्या बॅनरपासून दूर राहत आहेत.
राय यांनी या घटनाक्रमावर म्हटले आहे की, अधिकारी पक्षात कायम राहतील. कारण त्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा तसेच आमदारकीचा राजीनामा दिलेला नाही. आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार आहोत.
.........................................
नाराज आमदार भाजप खासदारासह दिल्लीकडे रवाना
कोलकाता : तृणमूल काँग्रेसचे आमदार मिहीर गोस्वामी हे भाजपचे खासदार निशित प्रामाणिक यांच्याबरोबर नवी दिल्लीत गेल्याने चर्चा सुरू झाली आहे. गोस्वामी यांनी मागील काही दिवसांपूर्वी तृणमूल काँग्रेसबद्दल नाराजी व्यक्त केली होती. ते भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, असे भाजपच्या सूत्रांचे म्हणणे आहे. तृणमूलने या घटनाक्रमावर काहीही बोलण्यास नकार दिला आहे. गोस्वामी यांच्याशी संपर्क झालेला नाही.
पक्षात २२ वर्षे राहिल्यानंतर अपमान सहन होत नसल्यामुळे पक्षात राहणे कठीण होत आहे, असेही ते फेसबुकवर पोस्टमध्ये म्हणाले होते. त्यांचे मन वळविण्यासाठी पक्षातर्फे प्रयत्न करण्यात येत होते.