लोकमत न्यूज नेटवर्कसेनगाव : सोमवारी सायंकाळी शहरासह तालुक्यात वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या पावसात सेनगाव-रिसोड या राज्य रस्त्यावर झाड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक तब्बल १५ तास ठप्प होती. प्रशासनाने रस्त्यावर निर्माण झालेला अडथळा दूर करण्यासाठी कोणतेच प्रयत्न केले नसल्याने शेवटी शहरातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन रस्त्यावरील अडथळा दूर करीत वाहतूक सुरळीत केली. शहरासह तालुक्यात सोमवारी सायंकाळी ६ वाजल्यापासून जोरदार पाऊस झाला. तब्बल ३ तास जोरदार पाऊस झाला. या पावसाने नदी-नाले भरून वाहिले. तालुक्यात सरासरी ४२.५० मि.मी. पावसाची नोंद झाली. त्यामध्ये सर्वाधिक पाऊस सेनगाव मंडळात झाला. वाऱ्यासह जोराचा पाऊस असल्याने रात्री ८ च्या सुमारास शहरानजीक रिसोड रस्त्यावर मोठे बाभळीचे झाड कोसळले. रात्रीच्या दरम्यान झाड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक रात्रीपासूनच ठप्प झाली होती. विदर्भ-मराठवाड्याला जोडणाऱ्या या मार्गावर धावणाऱ्या वाहनांची चांगलीच तारांबळ उडाली होती. या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना पर्यायी रस्ता शोधावा लागला. रस्त्यावर कोसळलेले बाभळीचे झाड मंगळवारी दुपारी ११ वाजेपर्यंत उचलले गेले नाही. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहतुकीची कोंडी झाली होती. या प्रकाराकडे सा.बां. विभागाने दुर्लक्ष केल्याने शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख संदेश देशमुख, प्रवीण महाजन, दीपक आसनकर, निखिल देशमुख, कैलास घाटोळकर, साहेबराव पोले यांच्यासह अन्य नागरिकांनी स्वत: पुढाकार घेऊन जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावरील अडथळा दूर केला. त्यानंतर तब्बल १५ तासानंतर या मार्गावर वाहतूक सुरळीत झाली होती.
सेनगाव-रिसोड राज्य रस्त्यावरील वाहतूक १५ तास ठप्प
By admin | Updated: June 28, 2017 00:03 IST