औरंगाबाद : आपण ऊसतोडणी करून पोट भरतो. निदान लेकरांच्या वाट्याला तरी हे जगणे येऊ नये म्हणून मानलेल्या बहिणीच्या सांगण्यावरून सारिकाचा विवाह संजय अग्रवाल याच्याशी लावला. पण पाच महिन्यांतच त्याने तिच्या अंगाची चटके देऊन-देऊन पार ‘चाळणी’ केली. आज मुलीच्या शरीरावरील डाग पाहून माझा जीव कासावीस होतोय. त्यांच्या जाचातून मुलगी वाचली, यातच समाधान मानणाऱ्या पीडित सारिकाच्या आईने मुलीला या मरणयातना पोहोचविणाऱ्या अग्रवाल कुटुंबियांना कडक शासन व्हावे, अशी भावना ‘लोकमत’जवळ व्यक्त केली. मूळच्या काळवटी तांडा (ता.अंबाजोगाई) येथील रहिवासी असलेल्या सारिकाच्या आई बारकूबाई जाधव या रविवारी संध्याकाळी औरंगाबादेत आल्या. घाटीत त्यांनी मुलीची अवस्था पाहिली. सोमवारी ‘लोकमत’शी बोलताना त्या म्हणाल्या, आम्ही काही महिन्यांपूर्वी कामानिमित्त परभणीला गेलो होतो. सोबतीला भाऊ विठ्ठल पवार होता. तेथेच सुवर्णा शिवाजी वंजारे हिच्याशी ओळख झाली. रोजच्या ओळखीमुळे विठ्ठल पवार यांनी सुवर्णा हिला ‘गुरूबहीण’ मानले. त्यामुळे सारिका तिला मावशी मानत होती. तिच्या ओळखीनेच सारिकाचा संजयशी विवाह करण्यात आला होता. घरच्या गरिबीमुळे मोठी सोयरिक पाहणे शक्य नव्हते. त्यामुळे सारिकाचे लग्न होतेय, यातच आम्ही समाधानी होतो. लग्नानंतर दोन दिवस सारिकाचे मामा विठ्ठल यांनीही मिसारवाडीत तिच्या घरी राहून सर्व परिस्थिती जाणून घेतली होती. दोन दिवस ते अतिशय चांगले वागले. जसे पाहुणे घरातून गेले, तसा त्यांनी छळ करायला सुरुवात केली. हळूहळू राहते घर छळछावणीच होऊन बसले.
मुलीच्या अंगाची ‘चाळणी’ पाहून जीव तीळ-तीळ तुटतोय
By admin | Updated: December 8, 2015 00:11 IST