आखाडा बाळापूर : हैदराबाद- इंदौर जाणाऱ्या कारला कळमनुरी तालुक्यातील डोंगरगाव (पुल) शिवारात घडलेल्या अपघातग्रस्त गाडीतील पंचनामा होण्याअगोदरच पोलिसांनी लांबवलेल्या बॅगचे रहस्य वाढल्याने आखाडा बाळापूर परिसरात चर्चेला उधान आले असून या घटनेची चौकशी सुरू असल्याचे सपोनि पंडित कच्छवे यांनी सांगितले.हैदराबाद येथून मध्य प्रदेशातील इंदौरकडे जाणाऱ्या गांज्या तस्करी करणाऱ्या कारला कळमनुरी तालुक्यातील डोंगरगाव पुल शिवारात अपघात घडला होता. यामध्ये दोनजण ठार तर एकजण गंभीर जखमी झाला होता. अपघातग्रस्त इंडिगो कारमध्ये दीड क्विंटलच्यावर गांजा असल्याने व अपघात भयंकर घडल्याने बघ्याची गर्दी वाढली होती. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांचे पथकही हजर झाले. तत्पुर्वीच कळमनुरी येथे दारुच्या गुन्ह्यातील शेवाळा येथील आरोपींना आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचा कर्मचारी घेवून जात होते. मात्र अपघात घडल्याने आरोपीसह घटनास्थळाकडे धाव घेतली. जखमींना उपचारासाठी पाठवून दिले. मात्र अपघातग्रस्त गाडीमध्ये मोठ्या प्रमाणात गांजाची पोती होती. प्रत्यक्षदर्शनीनुसार गाडीमध्ये पैशाची बॅगही होती तर प्रेताच्या खिशातही मोठ्या प्रमाणात रोख रक्कमही दिसत होती. यातील रोख रक्कम व पैशाची बॅग मात्र पंचनामा होण्याअगोदरच गायब झाल्याने चर्चेला पेव फुटले व गायब बॅगचा शोध सुरू झाला; परंतु पंचनामा संपला तरी बॅग व रोख रक्कम दिसून येत नव्हती. पत्रकारांनी या घटनेकडे लक्ष वेधले असता सुरूवातीला अशी कोणती बॅगच नसल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी पियुष जगताप यांनी सांगितले; परंतु पत्रकारांनी प्रश्न लावून धरल्याने काही वेळाने बॅग उघडली तर त्यामध्ये कपडे व खेळणी निघाली. तरीही घटनास्थळापासून पाच कि.मी. अंतर असलल्या पोलिस ठाण्यामध्ये ती बॅग अगोदरच घाई गडबडीने आणण्याचे प्रयोजन काय? ती बॅग सुरवातीला का उघडण्यात आली नाही? असे अनेक प्रश्न नागरिकांत उपस्थित होत आहेत. (वार्ताहर)
‘त्या’ अपघातातील गायब बॅगचे रहस्य वाढले; चौकशीचे आदेश
By admin | Updated: July 4, 2014 00:20 IST