मंठा : तालुक्यातील माळतोंडी गावात पिण्याचे पाणी आणण्यासाठी गेलेल्या युवतीचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. पाणी टंचाईचा तालुक्यातील हा दुसरा बळी आहे.मनिष श्रीपत घुगे (वय १७) असे या युवतीचे नाव आहे. गावाशेजारील विहीरीचे पाणी आणण्यासाठी ती गेली असता तोल जावून विहीरीत पडून तिचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती कळताच मंठा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेह विहीरीबाहेर काढला. पंचनामा केल्यानंतर उत्तरीय तपासणी करण्यात आली. या प्रकरणी मंठा पोलिस ठाण्यात अकस्मीक मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास पोकॉ. मोरे करीत आहेत. दरम्यान, याबद्दल पंचायत समिती सदस्य संतोष वरकड म्हणाले की, ग्रामपंचायतच्या विहिरीला पाणी कमी असल्याने गावात पाण्याची टंचाई आहे. त्यामुळे ग्रामस्थांना गावाशेजारील विहिरीवरुन पाणी आणावे लागते. त्यामुळे पाणी टंचाईचा हा बळी गेला आहे, असे ते म्हणाले. गेल्या महिन्यात नानसी येथे एका तरुणाचा विहिरीत पडून मृत्यू झाला होता. या दोन्ही घटना तालुक्यातील पाणी टंचाईची तीव्रता लक्षात आणून देणाऱ्या आहेत. (वार्ताहर)
मंठा तालुक्यात पाणी टंचाईचा दुसरा बळी
By admin | Updated: November 16, 2014 00:36 IST