ेहिंगोली : शहरातशिक्षणासाठी राहत असलेला १५ वर्षीय शाळकरी मुलगा काकाच्या घरातून रात्रीच्यावेळी अचानक गायब झाल्याची घटना १७ जून रोजी सकाळी उघडकीस आली. दरम्यान, पोलिसांनी मोबाईलचे लोकेशनचे शोधले असता तो शिर्डीत असल्याची माहिती मिळाल्याने एक पथक तिकडे पाठविण्यात आले आहे.शहरातील शिवाजी नगरमध्ये डॉ. संजय घुगे यांचा श्री विश्वब्रम्ह आयुर्वेदीक चिकित्सालय व पंचकर्म केंद्र आहे. दवाखान्यामागेच त्यांचे घर आहे. परभणी जिल्ह्यातील टाकळखोपा (ता. जिंतूर) येथील त्यांचा पुतण्या ऋषिकेश उद्धवराव घुगे (वय १५) हा हिंगोलीतील भारतीय विद्या मंदीर शाळेमध्ये यंदा दहावीच्या वर्गात शिकत आहे. शिक्षणासाठी तो काकाकडेच राहतो. सोमवारी शाळा सुरू झाल्या. सोमवारी रात्री तो नेहमीप्रमाणे काकांच्या दवाखान्यात झोपण्यासाठी गेला होता. मंगळवारी सकाळी ६ वाजता डॉ. संजय घुगे पत्नीला बसस्थानकावर सोडण्यासाठी गेले असता साफसफाई करणाऱ्या महिलेने आवाज देऊन दवाखान्याचा दरवाजा ऋषिकेशने आतून उघडला नाही. डॉक्टर परत आल्यावर त्यांनी दरवाजा जोराने लोटला असता तो आतून लावलेला नसल्याचे लक्षात आले. तसेच त्यांच्या कॅबीनमधील औषधी-गोळ्यांच्या बाटल्या, डब्बे अस्ताव्यस्त पडलेले आढळून आले. विशेष म्हणजे दवाखान्यात ऋषिकेशही दिसला नाही. चोरीचा संशय आल्याने डॉ. घुगे यांनी याबाबत पोलिसांना कळवले. त्यानंतर श्वानपथकासही पाचारण करण्यात आले. श्वानाने कॉलनीतील दत्त मंदिराजवळील एका घरापर्यंत माग काढला. पोलिसांनी सदरील बेपत्ता मुलाचा शोध सुरू केला. मंगळवारी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास देशमुख नावाच्या मित्रास मोबाईलवर कॉल करून ‘मी नागपूरला आहे. कुणाला सांगू नकोस’असे ऋषिकेशने सांगितले. हा कॉल त्याने शिर्डीतून एका क्वॉईन बॉक्सवरून केल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी मोबाईल लोकेशन शोधून सदरील मुलास आणण्यासाठी जमादार मगन पवार, पोना शेख वसियोद्दीन यांचे पथक डॉ. संजय घुगे यांना सोबत घेऊन मंगळवारी सायंकाळी शिर्डीला रवाना झाले. (प्रतिनिधी)
शाळकरी विद्यार्थी घरातून बेपत्ता
By admin | Updated: June 18, 2014 01:30 IST