औरंगाबाद : महाराष्ट्र परीक्षा परिषदेने शिष्यवृत्ती परीक्षेत यंदापासून आमूलाग्र बदल केले आहेत. नवीन शैक्षणिक वर्षापासून ही परीक्षा इयत्ता ५ वी आणि इयत्ता ८ वीच्या मुलांसाठी राहील. विशेष म्हणजे या शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांचे नापास अथवा पास असे वर्गीकरण न करता शिष्यवृत्तीसाठी पात्र अथवा अपात्र असे नमूद केले जाणार आहे. २०१६-१७ या नवीन शैक्षणिक वर्षापासून शिष्यवृत्ती परीक्षेत बदल करण्याचे धोरण शासनाने निश्चित केल्यामुळे मागील शैक्षणिक वर्षात (२०१५-१६) ही परीक्षा घेतली नव्हती. आतापर्यंत परीक्षा परिषदेच्या वतीने दरवर्षी इयत्ता चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते होती.नवीन शैक्षणिक वर्षापासून चौथीऐवजी पाचवी आणि सातवीऐवजी आठवीचे विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र ठरतील. यापुढे पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती योजना ही आता उच्च प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती योजना या नावाने ओळखली जाणार आहे.या परीक्षेत जे विद्यार्थी उत्तीर्ण होऊ शकले नाहीत, त्यांना नापास अथवा यशस्वी झालेल्यांचा पास, असा उल्लेख करण्यात येत होता. यापुढे विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताण येऊ नये म्हणून शिष्यवृत्तीस पात्र अथवा अपात्र असा उल्लेख करून तशी नोंद गुणपत्रिकेतही केली जाणार आहे. याशिवाय परीक्षा पद्धतीतदेखील यंदापासून बदल करण्यात आले आहेत.
शिष्यवृत्ती परीक्षेची इयत्ता बदलली
By admin | Updated: May 13, 2016 00:07 IST