हिंगोली : जिल्ह्यातील शिक्षकांच्या वेतनातील अनियमितता दूर करण्यासाठी जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी पोपटराव बनसोडे यांनी संबंधित यंत्रणेला कामाचे वेळापत्रक दिले आहे. त्यामुळे पुढील महिन्यापासून वेतनास विलंब होणार नाही अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.काही महिन्यांपासून शिक्षकांच्या मासिक वेतनात अनियमितता आहे. त्यातच शालार्थ प्रणालीच्या नावाखाली वेतन लांबणीवर पडत आहेत. त्यामुळे शिक्षक वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. आर्थिक व्यवहार खोळंबले असल्याने शिक्षकांत असंतोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभुमीवर शिक्षक प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष सुभाष जिरवणकर डॉ. पंजाबराव देशमुख राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष हरिभाऊ मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी सीईओंना निवेदन देवून मासिक वेतनाचा प्रश्न निकाली काढण्याची मागणी केली. या निवेदनाची दखल घेवून रखडलेल्या वेतन प्रश्नासंबंधी गटशिक्षणाधिकारी गटविकास अधिकाऱ्यांना यांना अनियमित वेतनासंबंधी विचारणा करून तात्काळ वेतन अदा करण्याचे आदेशित केले. तसेच यापुढे नियमित वेतन होण्यासंबंधी वेळापत्रकाचे नियोजन करून त्यानुसार त्याची कार्यवाही व्हावी, असे सुचित केले. वेळापत्रकाप्रमाणे काम न करणाऱ्या मुख्याध्यापक, केंद्रीय मुख्याध्यापक, गटशिक्षणाधिकारी, संबंधित शिक्षण विभाग वेतन देयके पाहणारा कर्मचारी यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल, असे आदेशित केले आहे. वेतनासंबंधी वेळापत्रक करणारा हिंगोली जिल्हा हा राज्यातील प्रथम जिल्हा आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अशा प्रकारचा निर्णय घेतल्यामुळे रखडलेल्या वेतनाचा प्रश्न येत्या दोन दिवसांत सुटणार आहे.सीईओंच्या कार्यवाहीचे शिक्षक संघटनांनी स्वागत केले. यावेळी जिरवणकर, मुटकूळे, मनोहर पोपळाईत, व्ही.डी. देशमुख, विनायक भोसले, विकास फटांगळे, गजानन जाधव, पंजाब वानखेडे, नामदेव आगलावे, विजय राठोड, राधाकृष्ण देशमुख, शंकर सरनाईक, मधुकर खणके, अशोक देवकर, प्रकाश घ्यार, रमेश जगताप, जेजेराव बदणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)
शिक्षकांच्या वेतनासाठी वेळापत्रक
By admin | Updated: July 7, 2014 00:33 IST