आखाडा बाळापूर : ग्रामीण रुग्णालयात गरजू रुग्णांनी औषधी मागितली की, औषधी संपली असल्याचा उद्घोष ऐकायला मिळतो. मात्र कालबाह्य झालेल्या औषधींचा मोठा ढिगारा पहावयास मिळतो. औषधीच नसतील तर कालबाह्य कशी होते? हा प्रश्न न सुटणारा आहे. आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात नियमीत अधिकारी-कर्मचारी भरलेले नसल्यामुळे येथील कारभार मनमौजी स्वरुपाचा असल्याचे दिसते. प्रतिनियुक्तीवरील अधिकारी व कर्मचारी येथील वेळ घालवतांना उपकाराच्या भावनेतूनच वेळ घालवतात. रुग्णांना औषधी मिळत नाही. औषधी वितरण करणारे इतरत्र पूर्णवेळ नेमणूक असलेले असल्याने बाळापूरात हजेरी लावण्यापुरतेच दिसतात. तास दोन तासानंतर येथून काढता पाय घेतात. अनेक वेळा तर कंत्राटी सफाई कामगारही औषध वाटप करताना दिसतात. कळत नसेल तर चक्क औषधी नाही, असा उद्घोष करून मोकळे होतात. औषधीबाबत तक्रार करण्यासाठी कोणीही जबाबदार अधिकारी येथे नसतो. औषधी उपलब्ध नाही, असे सांगतात पण कालबाह्य झालेल्या औषधींचा मात्र भलामोठा ढिगारा पहावयास मिळतो, याचाच अर्थ औषधी असतात. पण ती वितरित न केल्यामुळे औषधी कालबाह्य होतात. कालबाह्य झालेली औषधी जाळून नष्ट करावी, असा नियम आहे. परंतु या नियमाला येथे बगल दिली जाते. कालबाह्य औषधी रुग्णालयाच्या पाठीमागे एका खोलगट भागात उघड्यावर फेकली जातात. त्यावर माती ढकलल्याचे रुप देवून कर्तव्य बजावले जाते. एकंदरीत ग्रामीण रुग्णालयाचा कारभार रामभरोसे सुरू आहे. येथे प्रशासन अस्तित्वात आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित होतो. प्रशासनाने येथे लक्ष घालून गोरगरीब जनतेला आरोग्य सुविधा पुरविण्याचे काम करावे, अशी सवसामान्यांची अपेक्षा आहे.डॉक्टर म्हणतात, गरजेची औषधी आहेबाळापूरात ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी अधिकारी डॉ. नरवटे यांना औषधीबाबत विचारले असता बेसिक निड्सची सर्व औषधी उपलब्ध असल्याचे सांगितले. खोकल्याचे औषध वगैरे सारख्या औषधींची मागणी अधिक असल्याने कधी-कधी तुटवडा पडतो. कळमनुरीच्या दोन कर्मचाऱ्यांना दहा-दहा दिवस बाळापुरात सेवा देण्याचे आदेश झाले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांची समस्या थोडीबहुत दूर होईल. तर बाळापूरच्या औषधनिर्मात्याने राजीनामा दिल्याने हे पद रिक्त आहे. कालबाह्य औषधी आम्ही जाळून नष्ट करतो, असा दावाही त्यांनी केला. कालबाह्य औषधी जाळून नष्ट करण्याची नियमावली आहे. परंतु ग्रामीण रुग्णालयात या नियमाला पूर्णत: तिलांजली देण्यात आली असून रुग्णालयाच्या पाठीमागे खोलगट भागात उघड्यावर फेकून दिले जाते.
गरजूंना वाटायला औषधींचा तुटवडा
By admin | Updated: March 19, 2016 20:19 IST