औरंगाबाद : महापालिकेत कागदावरच खाजगी सुरक्षारक्षक नेमून ३१ लाख रुपयांचा घोटाळा करण्यात आल्याचे नुकतेच समोर आले असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. महापालिकेतील मुख्य लेखापरीक्षक दीपाराणी देवतराव यांच्याकडे चौकशी सोपविण्यात आली आहे. चौकशीसाठी सुरक्षारक्षक प्रकरणाची मुख्य फाईलही त्यांच्याकडे सादर करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त रमेश पवार यांनी दिली.महापालिका मुख्यालय, संत एकनाथ रंगमंदिर, सिडको नाट्यगृह आदी ठिकाणी प्रशासनाने खाजगी एजन्सीमार्फत सुरक्षारक्षक नेमले आहेत. मागील पाच ते सहा वर्षांपासून खाजगीकरणाचा हा प्रयोग सुरू आहे. सुरुवातीचे काही दिवस महापालिकेत व अन्य ठिकाणी सुरक्षारक्षक दिसून येत होते. नंतर त्यांची संख्या आपोआप कमी झाली. मात्र रेकॉर्डवर सुरक्षारक्षक तेवढेच ठेवण्यात आले. २०१२ पासून आजपर्यंत कागदावर नेमलेल्या सुरक्षारक्षकांच्या नावावर लाखो रुपयांची बिले उचलण्यात आली. एकूण ३१ लाख रुपयांचा हा सुरक्षारक्षक घोटाळा असल्याचे सांगण्यात येत आहे. महापालिकेच्या कामगार विभागातर्फे सुरक्षारक्षकांचा कारभार पाहण्यात येतो. या विभागातील दैनिक वेतनावर काम करणारा नितीन सांगळे व महापालिकेतील काही अधिकाऱ्यांनी मिळून हे कारस्थान केल्याचेही बोलल्या जात आहे. कामगार विभागातील एकामहिला लिपिकाची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. दैनिक वेतनावर काम करणाऱ्या नितीन सांगळे यालाही कामावरून कमी करण्यात येणार आहे.
घोटाळ्याची चौकशी सुरू...!
By admin | Updated: July 10, 2016 01:01 IST