लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : विघ्नहर्त्या गणरायाला मंगळवारी निरोप दिला जाणार असून या निरोपाची भाविकांनी तसेच प्रशासनानेही तयारी केली आहे. १२ दिवसांच्या पूजाअर्चेनंतर आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी गणेशभक्त सज्ज झाले आहेत. ‘पुढच्या वर्षी लवकर या’, अशी आर्त हाक देत गणरायाला निरोप दिला जाणार आहे.गणेश चतुर्थीला गणरायाची वाजतगाजत ढोल-ताशांच्या गजरात आगमन झाले होते. यंदा गणेशोत्सव १० ऐवजी १२ दिवसांचा होता. या कालावधीत गणेश मंडळांच्या वतीने तसेच घरगुती गणेशाच्या स्थापनेनंतर विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रम घेण्यात आले. विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात अन्नदानही करण्यात आले. जिल्ह्यात यंदा जवळपास ३ हजार ‘श्रीं’ ची स्थापना करण्यात आली होती. त्यात नांदेड शहरातही जवळपास साडेचारशे सार्वजनिक मंडळांनी ‘श्रीं’ ची स्थापना केली होेती.गणेशोत्सव काळात संपूर्ण वातावरण आनंदाचे, उत्साहाचे होते. याच कालावधीत मुस्लिम बांधवांची बकरी ईदही आली होेती. हा सणही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रशासनापुढे या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी घेण्याचे मोठे आव्हान होते. योग्य नियोजनातून ते आव्हान पेलण्यातही आले.जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली ‘श्री’ स्थापनेच्या पूर्वसंध्येला शांतता बैठक घेऊन संपूर्ण नियोजन केले होते. यात पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनीही काही सूचना दिल्या होत्या. त्या सूचनांचेही गणेशोत्सव कालावधीत काटेकोरपणे पालन झाले. परिणामी संपूर्ण उत्साहात गणेशोत्सव आणि बकरी ईदही पार पडली. मंगळवारी ‘श्रीं’ चे विसर्जन होणार आहे. हे विसर्जनही शांततेत व आनंदाच्या वातावरणात पार पडावे, यासाठी तयारी करण्यात आली आहे.विसर्जनाच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी कार्यालयात विभागप्रमुखांची बैठक घेऊन तयारीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीनंतर जिल्हाधिकारी डोंगरे, पोलीस अधीक्षक मीना, महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी शहरातील मुख्य मिरवणूक मार्ग व विसर्जन घाटांना भेटी दिल्या. या मार्गावरील बंदोबस्ताची पाहणी केली.
‘श्री’ ला आज निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 00:35 IST