औरंगाबाद : दुष्काळी परिस्थितीमुळे मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. जानेवारीपासून मार्चअखेरपर्यंत तीन महिन्यांत विभागात तब्बल २२६ शेतकऱ्यांनी नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून स्वत:ची जीवनयात्रा संपवली आहे. या काळात बीड जिल्ह्यात सर्वाधिक ६४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. कमी पावसामुळे मराठवाड्यात सलग तिसऱ्या वर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे विभागातील शेतकरी पुरता अडचणीत आला आहे. यंदाच्या वर्षी खरिपाचे संपूर्ण पीक पाण्याअभावी हातचे निघून गेले. शिवाय रबीची पेरणीही होऊ शकली. दोन्ही पिकांचे उत्पन्न बुडाले, आता पुढील वर्ष कसे काढायचे ही विंवचना असतानाच अनेकांना त्यांच्याकडील कर्जाच्या वसुलीसाठी सावकार आणि बँकांच्या तगाद्याला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या सर्वाला कंटाळून अनेक जण आत्महत्या करीत आहेत. विभागात १ जानेवारीपासून मार्चअखेरपर्यंत तीन महिन्यांत २२६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.औरंगाबाद जिल्ह्यात ३८, जालना जिल्ह्यात १२, परभणी जिल्ह्यात १२, हिंगोली जिल्ह्यात ०, नांदेड जिल्ह्यात ३६, बीड जिल्ह्यात ६४, लातूर जिल्ह्यात २० आणि उस्मानाबाद जिल्ह्यात ३५५ जणांनी आत्महत्या केल्या आहेत. विभागात आतापर्यंत झालेल्या आत्महत्यांपैकी १०८ प्रकरणांत संबंधित शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना शासनाकडून प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. २८ प्रकरणे मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आली आहेत, तर ९० प्रकरणांची चौकशी अद्याप पूर्ण व्हायची आहे.
सव्वादोनशे शेतकऱ्यांच्या आत्महत्या
By admin | Updated: April 7, 2015 01:25 IST