औरंगाबाद : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या आग्रहाखातर औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून अतुल सावे यांना भाजपाची उमेदवारी बहाल करण्यात आली. त्यामुळे पक्षात मोठी तणातणी होऊन प्रकरण हमरीतुमरीपर्यंत येऊन पोहोचले होते. उमेदवारी दाखल करण्याच्या निर्धारित वेळेच्या अर्धातास अगोदरपर्यंत सावे यांना गुपचुप एबी फॉर्म देण्यातआला. यादी घोषित न करताच भाजपाला शनिवारी उमेदवारांना गुपचूप एबी फॉर्म देण्याची वेळ आली. औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून भाजपाची उमेदवारी संजय केणेकर यांना दिली जाईल, अशी पक्षात चर्चा होती. दुपारी दीड वाजेपर्यंत पक्षातर्फे कुणीही उमेदवारी दाखल करण्यासाठी आला नव्हता. पावणेदोन वाजेच्या सुमारास संजय केणेकर व त्यांचे समर्थक कार्यालयात पोहोचले. त्यामुळे केणेकर यांनाच उमेदवारी जाहीर झाल्याचे वाटले; परंतु त्यानंतर दहा मिनिटांनी अतुल सावेही दाखलझाले. दरम्यान, शिरीष बोराळकर, बापू घडामोडे, डॉ. भागवत कराड व अन्य पदाधिकारीही त्यांच्या समर्थकांसह आले. परंतु केणेकर व सावे या दोघांकडेही पक्षाचा एबी फॉर्म नव्हता. भाजपाचे प्रदेश सरचिटणीस सुरजितसिंह ठाकूर दोन वाजेच्या सुमारास आले. त्यांनी एबी फॉर्म सावे यांना सुपूर्द केला. हे समजल्यावर केणेकर संतप्त झाले. त्यांनी उपस्थितांना शिव्यांची लाखोली वाहत संताप व्यक्त केला. केणेकर यांचे समर्थकही मोठ्या संख्येने आले होते. सावे व केणेकर हे दोन गट आमनेसामने झाले होते. परंतु पोलिसांनी दोघांच्याही समर्थकांना बाहेर हुसकावून लावले व अनुचित प्रसंग टळला. योग्य उमेदवाराची चाचपणी करण्यासाठी पक्षाने स्वतंत्र सर्व्हे केला होता. त्यात मी पहिल्या क्रमांकावर होतो. गेली २५ वर्षे पक्षासाठी पडेल ते काम करतो आहे. परंतु पक्षातील काही प्रवृत्तीने अन्याय केल्यामुळे कोलमडून पडलो आहे. मी न्याय मागण्यासाठी पक्षनेते अमित शहा यांना पत्र लिहिणार आहे. परंतु पक्षनिष्ठ कार्यकर्ता असल्यामुळे मी पक्षाचेच काम करीन. -संजय केणेकर
गडकरी यांच्या आग्रहाखातर सावेंना उमेदवारी
By admin | Updated: September 28, 2014 01:03 IST