उस्मानाबाद : चार वर्षांपूर्वी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार बोगस डॉक्टरांविरूद्ध कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली होती. त्यामुळे अशा डॉक्टरांचे प्रमाण कमी झाले होते. त्यानंतर मात्र, अशा बोगस डॉक्टरांविरूद्ध एकही कारवाई झालेली नाही. त्यामुळे त्यांचे मनोबल उंचावले आहे. आजघडील जिल्ह्याच्या विविध भागात १७ बोगस डॉक्टर (मुन्नाभाई) वैधकीय व्यवसाय करीत आहेत. ही बाब आरोग्य विभागाकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून समोर आली आहे. असे असतानाही संबंधितांविरूद्ध कारवाई का होत नाही? असा सवाल आता उपस्थित होवू लागला आहे.चार वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून बोगस डॉक्टरांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यावेळी तब्बल १३८ डॉक्टर अनधिकृतपणे वैद्यकीय व्यवसाय करीत असल्याचे समोर आले होते. हा जीवघेणा प्रकार लक्षात घेवून तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार जिल्हाभरात बोगस डॉक्टरांविरूद्ध धडक मोहीम हाती घेण्यात आली होती. त्यावेळी अचानक छापे मारून तब्बल ८० बोगस डॉक्टरांविरूद्ध पोलिस कारवाई करण्यात आली. तर कारवाईची कुणकुण लागताच उर्वरित डॉक्टर पसार झाले होते. या धडक कारवाईनंतर बोगस डॉक्टरांना चाप बसला होता. मात्र, मध्यंतरीच्या काळात अशा स्वरूपाची एकही धडक कारवाई होवू शकली नाही. त्यामुळे अनधिकृत डॉक्टरांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून आॅक्टोबर २०१४ मध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणाअंती जिल्ह्याच्या विविध भागात १७ डॉक्टर अनधिकृतपणे वैद्यकीय व्यवसाय करीत असल्याचे आढळून आले आहे. यामध्ये शहरांपेक्षा ग्रामीण भागातील डॉक्टरांची संख्या ही अधिक आहे. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार ११ डॉक्टर हे ग्रामीण भागात तर ६ डॉक्टर हे शहरी भागात आहेत. (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाच्या वतीने बोगस डॉक्टरांविरूद्ध राबविण्यात आलेल्या धडक मोहिमेचा धसका घेवून ४१ डॉक्टरांनी व्यवसाय बंद केल्याचा दावा आरोग्य विभागाकडून केला जात आहे. असे असले तरी यातील अनेकांनी गावे बदलून दवाखाने थाटले आहेत. त्यामुळे अशा डॉक्टरांचा शोध घेण्याची गरज आता निर्माण झाली आहे.आरोग्य विभागाकडून आॅक्टोबर २०१४ मध्ये सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यानुसार नव्याने १७ बोगस डॉक्टर आढळून आले आहेत. याचे सर्वाधिक प्रमाण उस्मानाबाद, त्यानंतर उमरगा तालुक्यात आहे. तर तुळजापूर, वाशी आणि कळंब या तीन तालुक्यात एकही बोगस डॉक्टर नसल्याचा दावा आरोग्य यंत्रणेकडून करण्यात आला आहे.
जिल्ह्यात सतरा मुन्नाभाई..!
By admin | Updated: February 12, 2015 00:56 IST