संतोष हिरेमठ/छत्रपती संभाजीनगर : लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय खात्याचा निधी वर्ग केल्यामुळे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी संताप व्यक्त केला. सामाजिक न्याय खातेच बंद करा, असे शिरसाट म्हणाले. या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता, ‘त्याबद्दल मुख्यमंत्री विचार करतील’ असे उत्तर पवारांनी दिले.
अजित पवार यांनी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना अवघ्या चार ओळीत संजय शिरसाट यांच्या नाराजीविषयी प्रतिक्रिया व्यक्त केली. शिंदेसेनेचे नेते तथा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अर्थ खात्याबाबत नाराजी व्यक्त करत गंभीर आरोप केले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागातून पैसे वळते केल्याचा आरोप संजय शिरसाट यांनी केला. यासंदर्भात माध्यमांनी विचारले असता ‘त्याबद्दल मुख्यमंत्री विचार करतील’ असे उत्तर अजित पवार यांनी दिले.