जालना : नागपूर ते मुंबई या समृद्धी महामार्गाची ३० टक्के संयुक्त मोजणी पूर्ण झाल्यानंतर काही कारणामुळे ही मोजणी रखडली होती. बुधवारी जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उर्वरित ७० टक्के मोजणीचे काम लवकरच सुरू करण्याचे यावेळी निश्चित झाले. यावेळी अधिकारी तसेच संबंधित शेतकरी उपस्थित होते. समृद्धी मार्ग जालना तसेच बदनापूर तालुक्यातून जाणार आहे. या मार्गासाठी शेतकऱ्यांची शेकडो हेक्टर जमीन अधिग्रहित करण्यात येणार आहे. मावेजा तसेच अन्य इतर कारणांवरून जमिनीची ३० टक्के मोजणी झाली. उर्वरित मोजणीचे काम शेतकऱ्यांकडून थांबविले जात होते. यावेळी शेतकऱ्यांनी विहिरी तसेच फळबागांचे मूल्यांकन चुकीचे होत असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. सदर झाडांचे व विहिरींचे मूल्यांकन नव्याने करण्यात यावेत, अशी मागणी आहे. चार वर्षांपूर्वी महावितरणने टॉवर उभारणीसाठी झाडांचे मूल्यांकन करून ५ हजार २०० रूपयांचा दर दिला होता. आता समृद्धी मार्गाच्या मोजणीवेळी झाडांची किंमत फक्त २१०० रूपये देण्यात येत असल्याचे कृती समितीचे प्रशांत वाढेकर यांनी सांगितले. शेतकऱ्यांसोबत वाटाघाटीनंतर जमिनीची खरेदी करण्यात येणार असल्याची चर्चा यावेळी झाली. यावेळी उपविभागीय अधिकारी राजेश जोशी, जगदीश मणियार आदी उपस्थित होते.
समृद्धी मार्गाची मोजणी पुन्हा सुरू होणार
By admin | Updated: January 26, 2017 00:02 IST