उस्मानाबाद : छत्रपती संभाजी महाराजांनी ३२ वर्षांच्या काळात चार ग्रंथ, चोवीस उपग्रंथ लिहिले. विशेष म्हणजे, वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी संस्कृतमध्ये दोन ग्रंथ लिहिणाऱ्या संभाजी राजेंचे आठ भाषांवर प्रभूत्त्व होते. केवळ ज्ञानापुरताच विषय नव्हे तर तितकेच ते पराक्रमीही होते. त्यामुळेच औरंगजेबासारख्या महाबलाढ्य राजाला त्यांनी जेरीस आणले. मात्र, संभाजी महाराजांचा खरा इतिहास जाणीवपूर्वक पुढे येवू दिला गेला नसल्याची खंत यशवंत गोसावी यांनी व्यक्त केली. येथील मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित शिवसप्ताहाचे दुसरे पुष्प गुंफताना ‘शिवपूत्र शंभू राजे’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, व्ही. व्ही. मोरे, मोहन उंबरे, इंद्रजीत जाधव, सतीश दंडनाईक, शरद जाधव, देवेंद्र कदम, राजाभाऊ पवार, अशोक बागल, इंद्रजीत देवकते आदींची उपस्थिती होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून शंभू राजांनी आदर्श कारभार केला. आपल्याकडे महापुरूषांच्या कर्तृत्वाचा मोठा इतिहास आहे. मात्र, महापुरूषांच्या विचारांतून आपण नेमके काय शिकतो, याचा गांभिर्याने विचार करायला हवा, असे ते म्हणाले. वयाच्या तिसऱ्या वर्षी आई वारल्यानंतर वयाच्या सातव्या वर्षी रयतेसाठी गहान राहणारा हा राजा किती शौर्यवान असेल, याचा अंदाज येतो, असे सांगत छत्रपती शंभू महाराजांचा इतिहास नव्या पिढीने समजून घ्यायला हवा. असे झाल्यास जगाच्या पाठिवर आपली मुले कुठेही कमी पडणार नाहीत, असे ते म्हणाले. यावेळी अशितोष माने, बालवक्ता कृष्णा तवले, धनंजय देशमुख यांचा प्रा. गोसावी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. दरम्यान, गुरूवारी राज्यस्तरीय त्रैभाषिक कवी संमेलन होणार आहे. (प्रतिनिधी)
संभाजी राजेंचा खरा इतिहास लपविला
By admin | Updated: February 12, 2015 00:56 IST