- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : पुणे, नांदेडसह राज्यभरातील अनेक शहरांत रेमडसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी, तेथील रुग्णांच्या नातेवाइकांकडून इंजेक्शनची शोधाशोध सुरू आहे. औरंगाबादेत या इंजेक्शनचा मुबलक साठा आहे. त्यामुळे इंजेक्शनसाठी थेट औरंगाबादेत धाव घेणे सुरू आहे. औरंगाबादेत १० हजारांपेक्षा अधिक इंजेक्शनचा साठा आजघडीला उपलब्ध आहे.
औरंगाबाद महापालिकेकडे तब्बल ८ हजार इंजेक्शनचा साठा आहे. तर जिल्हा रुग्णालयाकडे २ हजार इंजेक्शन उपलब्ध आहेत. तर घाटीकडे आगामी काही दिवस रोज १०० ते २५० रुग्णांना इंजेक्शन देता येईल, एवढा साठा उपलब्ध आहे. औरंगाबादेत रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त मिलिंद काळेश्वरकर म्हणाले. कोरोनावर रेमडेसिवीर हे इंजेक्शन प्रभावी मानले जात आहे. त्यामुळे या इंजेक्शनला मोठी मागणी आहे. राज्यातील पुणे, नांदेड, धुळे, जळगाव यासह अन्य शहरांत सहजासहज मिळत नसल्याची धक्कादायक परिस्थिती निर्माण झाली आहे.
औरंगाबादेत आजघडीला सर्वाधिक गंभीर रुग्ण घाटीत दाखल आहे. त्यामुळे याठिकाणी रेमडेसिवीर इंजेक्शनची सर्वाधिक गरज आहे. रुग्णालयात पुरेशा प्रमाणात इंजेक्शन उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. परंतु विविध शहरांतून घाटीला इंजेक्शनची मागणी केली जात आहे. दाखल रुग्णांना इंजेक्शन मिळणे आवश्यक असल्याने खासगी रुग्णालयाने इंजेक्शनचा साठा जाहीर करीत नसल्याचीही स्थिती आहे. इंजेक्शनसाठी नातेवाइकांना भटकंती करावी लागत आहे, अशी स्थिती अजून तरी औरंगाबादेत नाही.
राजकीय नेत्यांचा दबाब अन्य जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा परिषद आणि जिल्हा रुग्णालयांतील कोरोना रुग्णांसाठी औरंगाबादेत इंजेक्शनची मागणी केली जात आहे. रुग्णालयात या पक्षाचे राजकीय पदाधिकारी दाखल आहे, त्यांना तत्काळ इंजेक्शन पाहिजे, असे सांगितले जात आहे. इंजेक्शन देण्यासंदर्भात राजकीय नेत्यांकडून औरंगाबादेतील रुग्णालयांवर दबावही टाकला जाते. परंतु शासकीय पत्र असेल तर इतर जिल्ह्यातील रुग्णांसाठी इंजेक्शन दिले जात असल्याचे सांगण्यात आले.
मुबलक साठा आहेजिल्हा रुग्णालयाअतर्गंत २ हजार रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध आहे. तर महापालिकेकडे ८ हजार इंजेक्शनचा साठा आहे. त्याबरोबरच आणखी ४ हजार ५०० इंजेक्शनची ऑर्डर देण्यात आली आहे.- डॉ. सुंदर कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक
औरंगाबादची स्थितीपहिल्या लाटेत रोज ११५ इंजेक्शनची गरजआता रोज २५० ते ३०० इंजेक्शन गरजसध्या दाखल रुग्ण -१४, ८९७