सोयगाव : तालुक्यातील रवळा धरणाच्या गेटच्या साखळ्या तोडून, गेट फिरवून मंगळवारी मध्यरात्री विनापरवाना पाणी सोडून देण्यात आले. जामठी, रवळा, जवळा व पिंपळा या चार गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात अत्यल्प साठा असताना हजारो लिटर पाणी वाहून गेले, त्यामुळे चार गावांवर पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे.दरवर्षी ऐन टंचाईच्या काळात पाणी सोडले जाते. जामनेर तालुक्यातील गोंद्री येथील काही शेतकरी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून पाणी सोडत असल्याचा आरोप चारही गावांतील ग्रामस्थ करीत आहेत.धरणात केवळ १५ ते २० टक्केच जलसाठा शिल्लक असताना दि. १ जुलैच्या मध्यरात्री धरणाच्या गेटच्या साखळ्या दगडाने तोडण्यात आल्या व टिकासच्या साह्याने गेट फिरवून पाणी सोडून देण्यात आले. दि. २ रोजी ही बाब लक्षात आली, तोपर्यंत फत्तेपूर( ता. जामनेर)कडे जाणाऱ्या नदीत ५ ते ६ कि.मी.पर्यंत पाणी पोहोचले होते. आधीच पाणी कमी, त्यात हजारो लिटर पाणी वाहून गेल्याने चार गावांतील जवळपास सात हजार लोकांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागणार आहेत. आपल्या हक्काचे पाणी शेतीला न वापरता पिण्यासाठी राखून ठेवणारे शेतकरी पाणी सोडल्यामुळे संतप्त झाले आहेत. सदरील प्रकरणाची माहिती तहसील प्रशासनास कळविण्यात आली असून तलाठी खैरनार व ग्रामसेवक पाटील यांनी घटनास्थळी जाऊन वाहणारे पाणी गेट टाकून अडविले. पाटबंधारे विभागाचे मात्र अद्याप कुणीही फिरकलेले नाही. (वार्ताहर)परजिल्ह्यातील शेतकऱ्यांचा दरवर्षी उपद्व्यापदरवर्षी अशा प्रकारे या धरणातून अवैधरित्या पाणी सोडून दिल्या जाते. परंतु लघु पाटबंधारे विभाग याकडे दुर्लक्ष करते. तसेच तालुका प्रशासनाचाही या गंभीर प्रकरणाकडे कानाडोळा असतो. गेल्या वर्षीही असेच मे महिन्यात पाणी सोडून देण्यात आले होते. प्रकरण पोलिसांपर्यंत गेले होते. तरीही यंदा पुन्हा पाणी सोडल्या गेले. धरणात मोटारी टाकून पाणी उपसा करणाऱ्यांवर तहसील विभागाने जप्तीची कारवाई सुरू केलेली आहे; परंतु धरणातून पाणी चोरल्यामुळे काय कारवाई होणार, हे जाणून जामनेर तालुक्यातील गोंद्री येथील काही शेतकरी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा प्रकार करतात, असा आरोप ग्रामस्थ करीत आहेत.
रवळा धरणातील पाण्यावर दरोडा
By admin | Updated: July 4, 2014 01:10 IST