वसमत : भुकंप होणार असल्याची अफवा मंगळवारी रात्री पसरल्याने तालुक्यातील अनेक गावात व शहरातील अनेक भागात रात्री अनेकांनी रात्र जागून काढली. ही अफवा मोबाईलद्वारे जो-तो आपापल्या नातेवाईकांपर्यंत पोहोचवत असल्याने रात्रभर हा गोंधळ सुरूच होता. मंगळवारी रात्री ११ वाजल्यापासून भुकंपासंदर्भातील अफवांचे पेव फुटले. पूर्णा, परभणी, नांदेड भागातून भुकंपाची अफवा पसरल्याचे फोन येणे सुरू झाले. पूर्णा येथे भुकंप झाला, नांदेडला जमीन हलली, वसमतमध्ये भुकंप होणार, अशा अफवा मोबाईलद्वारे पसरणे सुरू झाल्याने शहरातील अनेक भागात रात्री नागरिक भितीपोटी जागे राहिले. तालुक्यातील खांडेगाव, टेंभूर्णी, सातेफळ, बळेगाव गावासह अनेक गावातही ही अफवा पसरल्याने तेथेही असेच वातावरण होते. विशेष म्हणजे न झालेल्या भुकंपाची शहानिशा करण्यासाठीही अनेकजण फोन लावत होते. त्यातूनही हा प्रकार वाढला. भितीपोटी जे जागे राहिले ते सुद्धा पाहुण्यांना ‘जागे’ करण्याचे काम इमाने इतबारे करत होते. पहाट झाल्यानंतरच ही अफवा असल्याचे समोर आले. (वार्ताहर)
भुकंपाची अफवा; रात्रभर जागरण
By admin | Updated: August 20, 2014 23:56 IST