औरंगाबाद : शासकीय कामकाज आणि सर्वसामान्यांना दिल्या जाणाऱ्या आॅनलाईन सेवेत गेली अनेक वर्षे आरटीओ कार्यालय पिछाडीवर होते. परंतु आता आरटीओ कार्यालयातील विविध कामेही वाहनधारकांना आॅनलाईन करता येणार आहेत. २० आॅक्टोबरपासून लायसन्स प्रक्रियेपासून आॅनलाईन कामकाजाचा शुभारंभ होणार आहे. अर्ज करण्यापासून शुल्क भरण्यापर्यंतची कामे वाहनधारकांना आॅनलाईन करता येणार आहेत. कार्यालयात तासन्तास रांगेत थांबण्यापासून वाहनधारकांची सुटका होणार आहे. शिकाऊ व पर्मनंट लायसन्ससाठी आजघडीला केवळ आॅनलाईन अपॉइंमेंट घेता येते. कागदपत्रे, शुल्क जमा करण्यासाठी उमेदवारांना कार्यालयात रांगेत उभे राहावे लागते. परंतु २० आॅक्टोबरपासून हा त्रास थांबणार आहे. आरटीओ कार्यालयात लायसन्सची प्रक्रिया सारथी १.० मधून सारथी ४.० मध्ये बदलण्यात आली आहे. नव्या पद्धतीमुळे आॅनलाईन अर्ज भरणे, त्यासाठी आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करणे, अपॉइंटमेंट घेणे, आॅनलाईन शुल्क भरण्याची सुविधा आॅनलाईन (इंटरनेट) उपलब्ध करण्यात आली आहे. सारथी या संकेतस्थळावरून मिळालेल्या सर्व अपॉइंटमेंटचे वेब अॅप्लिकेशन नंबर बदलणे आवश्यक राहील. बदलांना प्राथमिक स्तरावर सामोरे जाताना पूर्वी घेण्यात आलेल्या शिकाऊ लायसन्सच्या अपॉइंटमेंटधारकांना आवश्यक कागदपत्रे स्कॅन करण्यासाठी कार्यालयात स्कॅनरची सुविधा पुरविण्यात येणार आहे.
‘आरटीओ’ चे कामकाज गुरुवारपासून आॅनलाईन
By admin | Updated: October 18, 2016 00:32 IST