गडगा, ता. नायगाव : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने खाते असणाऱ्या शेतकऱ्यांनाही खाते नव्याने उघडण्याचे बंधनकारक केले असून पीक विमा ६४८ रुपये तर खाते उघडण्यासाठी ५०० रुपये मोजावे लागत असल्याने हजारो शेतकरी पीक विमा योजनेपासून वंचित राहण्याचे संकेत निर्माण झाले आहेत़मराठवाड्यात यंदा पावसाअभावी पीक परिस्थिती गंभीर बनली आहे़ अनेक गावांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे़ जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही भेडसावतो आहे़ संभाव्य दुष्काळीस्थितीत आर्थिक आधार मिळावा म्हणून केंद्र व राज्य शासन पुरस्कृत राष्ट्रीय कृती पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकरी विविध बँकेच्या शाखांना हेलपाटे मारत आहेत़ त्याच नायगाव तालुक्यात नांजिमस बँकेच्या अनेक ठिकाणी रातोळी, मांजरमसह अन्य शाखेमध्ये खाते असणाऱ्या शेतकऱ्यांना देखील नवीन खाते उघडल्याशिवाय विमा हप्त्याची रक्कम भरता येणार नसल्याचे जाचक आदेश तोंडी स्वरुपात काढले आहेत़ त्यामुळे एक खाते उघडण्याकामी ५०० रुपये अनामत रक्कम ठेव जमा करावी लागत असून यापूर्वी ज्यांची खाती झिरो बॅलंसवर काढण्यात आली होती व कर्जदार शेतकऱ्यांची खाते असताना देखील ते नव्याने काढावे मागचे खाते व सर्व कागदपत्रे वरिष्ठांकडे पाठविण्यात आल्याचे रातोळीचे शाखाधिकारी उमरे यांनी सांगितले़आता शेतकऱ्यांना खाते उघडण्यासाठी ५०० रुपये, फोटो व कागदपत्रे, प्रवासासाठी १०० असा एकूण १२५० रुपये खर्च प्रत्येक शेतकऱ्यास मोजावा लागत असल्याने यापेक्षा विमा न भरलेलाच बरा असे शेतकरी म्हणत आहेत़ परिणामी हजारो शेतकरी पीक विमा योजनेपासून वंचित राहण्याचे संकेत निर्माण झाले आहेत़ याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे़(वार्ताहर)
विमा हप्ता ६४८ रुपयांचा, खर्च १२५० रुपये
By admin | Updated: August 12, 2014 01:59 IST