कळंब : प्लॉट खरेदी-विक्रीच्या व्यवहारासाठी आलेल्या लातूर येथील एका इसमाच्या गाडीतील तब्बल सहा लाख चाळीस हजार रूपयांची रोकड असलेली बॅग चोरट्यांनी लंपास केली़ ही घटना सोमवारी सकाळी कळंब शहरातील ढोकी रोडवर घडली असून, या प्रकरणी कळंब पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़पोलिसांनी सांगितले की, लातूर येथील अशोक त्र्यंबकराव शिरसाटे हे सोमवारी सकाळी ढोकी रोडवर हार्डवेअर दुकानाचे मालक बद्रोद्दीन यांच्याकडे प्लॉट खरेदी-विक्रीच्या व्यवहारासाठी आले होते़ मात्र, व्यवहारातील रक्कम अपुरी असल्याने शिरसाटे हे कारमध्ये (क्ऱएम़एच़२५- व्ही़७९७४) पैसे ठेवून चालक सुधाकर जाधव याच्यासोबत परत निघत होते़ त्यावेळी त्यांच्या गाडीजवळ एका लहान मुलाने येवून गाडीतून काही तरी गळत आहे, असे सांगितले़ त्यानंतर मालक सिरसाटे व चालक जाधव हे खाली उतरून पाहत असताना बॉनेटवर अज्ञात इसमाने जळालेले आॅईल टाकल्याचे दिसून आले़ ते आॅईल पुसून परत गाडीत बसताना बॅग लंपास झाल्याचे शिरसाटे यांच्या लक्षात आले़ बॅगची चोरी झाल्याचे लक्षात येताच शिरसाटे यांनी तातडीने कळंब ठाण्याला माहिती दिली़ प्रकरणी शिरसाटे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरूध्द रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान, पोलिसांना घटना घडलेल्या ठिकाणी एका संशयिताने मोबाईल रिचार्ज केल्याची माहिती मिळाली होती़ त्या माहितीच्या आधारे कळंब पोलिस व बीड स्थागुशाच्या पोलिसांनी त्या इसमाचा दिवसभर शोध घेतला़ मात्र, त्यांना कोणताच सुगावा लागला नाही़ साडेसहा लाख रूपयांची बॅग लंपास झाल्याचे वृत्त शहरात पसरताच एकच खळबळ उडाली आहे़
साडेसहा लाखांची बॅग लंपास
By admin | Updated: August 12, 2014 01:57 IST