लातूर : जलयुक्त घर अभियानाची हाक ‘लोकमत’ने दिली होती. या हाकेला लातूरकरांनी ‘ओ’ दिली असून, रोटरी क्लब आॅफ लातूर मिडटाऊन व आडत व्यापारी असोसिएशनच्या वतीने प्रत्यक्ष अभियानाला प्रारंभ केला आहे. रेनवॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी या संस्थांनी मार्केट यार्डात २ हजार पत्रके वाटून लोकांना या मोहिमेत सहभागी करून घेतले आहे. बाजार समिती परिसरात या मोहिमेचा गुरुवारी प्रारंभ करण्यात आला. यामुळे रो. अजय दुडिले, रवि जोशी, राजेश शहा, राहुल झिंगाडे, कल्याण घुगे, मन्मथ पंचाक्षरी, चेतन पंढरीकर, अजिंक्य सोनवणे, श्रीनिवास टाकळीकर, आनंद मालू, बसवराज चवळे आदींची उपस्थिती होती. भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेता ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही मोहीम राबविणे गरजेचे आहे. ‘पाणी हेच जीवन आहे.’ ‘जल है तो कल है’ अशा आशयाची पत्रके यावेळी वाटण्यात आली. घराच्या छतावरील वाहून जाणारे पावसाचे पाणी पाईपलाईनद्वारे आपण केलेल्या जलपुनर्भरणाच्या खड्ड्यात सोडल्यास ते जमिनीत मुरेल. जिथे बोअर आहे, त्या ठिकाणी त्याच्या भोवताली पुनर्भरण करावे. पावसाचे पाणी नैसर्गिकरित्या ज्या ठिकाणी जमा होते, अशा ठिकाणी हा खड्डा करावा. पावसाचे पाणी पाईपद्वारे खड्ड्यात सोडावे. पर्यास्त आकाराचा ५ ते १० फूट व्यासाचा चौरस खड्डा घ्यावा. त्याची खोली वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी असू शकते. साधारणत: दोन मीटर किंवा त्यापेक्षा अधिक खोल असावा. त्यामध्ये सर्वात खाली मोठे दगड टाकावे. त्यानंतर मोठी खडी टाकावी व त्यानंतर २० मि.मी. आकाराची खडी व त्यावर वाळूचा थर द्यावा, असे आवाहन रोटरी क्लब आॅफ लातूर मिडटाऊनने केले आहे. दरम्यान, ‘लोकमत’ने ‘चला राबवूया जलयुक्त अभियान’ अशी हाक दिली होती. या हाकेला संस्थांनी ‘ओ’ देऊन कामाला प्रारंभ केला आहे. अन्य संस्था व नागरिकांनीही या मोहिमेत सहभागी होऊन जलसंवर्धनातून जलपुनर्भरण करण्यासाठी कामाला लागावे, असा संकल्प करावा. (प्रतिनिधी)
‘जलयुक्त घर’ साठी रोटरीही सरसावली
By admin | Updated: January 15, 2016 00:02 IST