औरंगाबाद : विधानसभा निवडणुकांसाठी शुक्रवारी आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागात दिवसभर कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांची वर्कआॅर्डरसाठी धावाधाव सुरू होती. अनेक कंत्राटदारांना तांत्रिक कारणांमुळे वर्कआॅर्डर देता आलीच नाही. सार्वजनिक बांधकाम विभागात मागील एक महिन्यापासून विविध विकासकामांची वर्कआॅर्डर करून घेणे आणि झालेल्या कामांचे उद्घाटन करण्यावर व्यापक प्रमाणात भर देण्यात येत होता. कामाच्या या वर्कलोडमुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांची बरीच दमछाक होत होती. अनेक अधिकाऱ्यांनी तर आपल्या कक्षात न बसता तिसऱ्या ठिकाणी बसण्यावर भर दिला होता. अधिकारी कुठेही बसले तरी कंत्राटदार, लोकप्रतिनिधींचे कार्यकर्ते त्यांना शोधून काढत होते.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निविदा प्रक्रिया पूर्ण झालेल्या कामांनाच आज वर्कआॅर्डर देण्यात आली. आणखी काही कामे निविदा प्रक्रिया पूर्ण न झाल्याने तशीच पडून आहेत. आचारसंहिता संपल्यावरच त्याची वर्कआॅर्डर देण्यात येईल. मागील एक महिन्यात किमान १० कोटी रुपयांच्या विविध नवीन कामांचे उद्घाटन करण्यात आले.२० कोटी रुपयांची कामे वाटली...मागील १५ दिवसांमध्ये वेगवेगळ्या हेडअंतर्गत सुमारे २० कोटी रुपयांची कामे वाटण्यात आली आहेत. यामध्ये लोकप्रतिनिधींच्या निधीची कामे अधिक आहेत. वर्कआॅर्डर होताच अनेक लोकप्रतिनिधींनी भूमिपूजनावर भर दिला होता.
वर्कआॅर्डरसाठी धावाधाव
By admin | Updated: September 13, 2014 00:34 IST