पाटोदा : रोहयोच्या विहिरीचे पैसे शेतकऱ्याच्या नावाने उचलल्याप्रकरणी सरपंच, ग्रामसेवक व पोस्टमन यांच्याविरूध्द पाटोदा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काकडहिराचे तत्कालीन सरपंच विनोद रामकिसन जायभाये, ग्रामसेवक जमदाडे व निरगुडी पोस्टाचे पोस्टमन सय्यद हबीब पठाण यांचा आरोपींत समावेश आहे. शेतकरी महादेव पांडूरंग जायभाये यांना १३ मे २०११ रोजी मग्रारोहयोंतर्गत एक लाख ९० हजार रूपये किंमतीची व्यक्तीगत लाभाची विहीर मंजूर झाली होती. त्यांनी खोदकाम केले होते. मात्र, सरपंच, ग्रामसेवक यांनी हजेरीपत्रक तयार केले. २२ लोकांच्या नावे निरगुडी येथील पोस्टात खाते उघडले. पोस्टनमनच्या संगनमताने १ लाख २८ हजार रूपयांची रक्कम उचलली. विहिरीचे काम करूनही पैसे मिळत नसल्याने जायभाये यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. मात्र, पैसे पोस्टाच्या खात्यावरून पाठवल्याचे समजले. त्यावरून आपली फसवणूक झाल्याचे जायभाये यांच्या लक्षात आले. (वार्ताहर)