विकास राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मुंबई ते नागपूरपर्यंत जाणारा समृद्धी महामार्ग प्रस्तावित असताना मुंबई ते कोलकाता हा इकॉनॉमिक कॉरिडॉर कुठून आणि कसा जाणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मुंबई ते कोलकाता मार्गासाठी नव्याने भूसपांदन करणार की समृद्धी मार्ग वगळून नागपूर ते कोलकाता असा तो मार्ग विकसित करणार याबाबत कुठलीही स्पष्टता नाही. मात्र असे असले तरी त्या मार्गाची घोषणा करण्यात आल्यामुळे पुन्हा कोणते भूसंपादन करणार असा प्रश्न प्रशासन आणि शेतक-यांतून उपस्थित होत आहे. याबाबतीत राज्य सरकार आणि केंद्र यांचाही ताळमेळ नसल्याचे समोर येत आहे.गेल्या आठवड्यात केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी १२ इकॉनॉमिक कॉरिडॉरची घोषणा केली; परंतु ते विद्यमान रस्त्यांना जोडणार की नव्याने तयार करणार याबाबत काहीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे ते १२ इकॉनॉमिक कॉरिडॉर कनेक्टिव्हिटी अद्याप घोषणेपुरतीच असल्याचे दिसते आहे. नुसत्या घोषणांमुळे गडकरी हे निव्वळ ‘घोषणाकरी’ होत असल्याचे दिसते. राज्यात समृद्धी महामार्गासाठी भूसंपादन प्रगतिपथावर आहे. मुंबई ते नागपूर असा ७२० कि़मी. पर्यंत तो मार्ग जाणार आहे. त्या मार्गाचा अंतिम आराखडा अद्याप समोर आलेला नाही. भूसंपादनानंतर मार्किंग आणि अलायमेंट ठरेल. त्यानंतर महामार्गाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होईल. याच मार्गाला नागपूरपासून पुढे कोलकाताकडे नेण्यात येणार आहे की नाही नव्याने सगळे काही करायचे. याची स्पष्टता अद्याप नाही. जर तसे होत असेल तर मग ४२ हजार कोटी रुपयांच्या समृद्धी महामार्गाचा काहीअंशी खर्च केंद्र शासनाने उचलण्याची मागणी होत आहे. त्या मार्गासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर निधी उभारण्यात येत असून, एमएसआरडीसी लि. नावाने स्पेशल पर्पज व्हेकल (एसपीव्ही) स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
रोडकरी फक्त घोषणाकरी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 01:05 IST