सेलू : तालुक्यातील तिडीपिंपळगांव येथे रस्त्याच्या कामासाठी प्राप्त झालेल्या निधीचा अपहार करून काम न करताच निधी उचलल्याचा आरोप करत पिंपळगांव येथे शिवगर्जना मित्र मंडळाचे अध्यक्ष पवन घुमरे यांनी आपल्या सहकार्यासह पंचायत समिती कार्यालयासमोर ३० जूनपासून उपोषण सुरू केले आहे़ पिंपळगाव येथे शेत रस्त्यासाठी निधी प्राप्त झाला होता़ मात्र रस्त्याचे काम न करताच अपहार करण्यात आला असल्याचे उपोषणकर्त्यांनी नमुद केले आहे़ रस्त्याचा सर्व निधी रस्त्यावरची झुडपे तोडण्यासाठी खोदकामासाठी खर्च केल्याचे दाखवून मुरूमासाठी एकूण रक्कमेच्या केवळ दहा टक्के निधी केल्याची माहिती अधिकारात माहिती दिली आहे़ परंतु, प्रत्यक्षात रस्त्यावर कुठलेही काम न करता बिले उचलली गेली आहेत़ या रस्त्यासाठी सहा लाख छत्तीस हजार पाचशे बेचाळीस रुपये प्राप्त झाले होते़ परंतु या निधीचा अपहार करून काम न करता बील घेण्यात आले आहे़ या प्रकरणी संबंधितांवर कार्यवाही करावी या मागणीसाठी शिवगर्जना मित्रमंडळाचे अध्यक्ष पवन घुमरे यांनी उपोषण सुरू केले आहे़ तसेच त्यांना कृष्णा घुमरे, हरिभाऊ पोंढे, माऊली घुमरे, तात्याराव घुमरे, केशव घुमरे, शाहुराव जोगदंड, अन्नासाहेब घुमरे, गोविंद घुमरे, त्रिबंक पोंढे, मारोती जोगदंड, प्रकाश कच्छवे, रामेश्वर घुमरे, भागवत जोगदंड, दिपक जोगदंड, भाऊराव मिरगे यांनी पाठींबा दिला आहे़ (प्रतिनिधी)
रस्ता कामात अपहार
By admin | Updated: July 2, 2014 00:15 IST