शेंदूरवादा : गंगापूर तालुक्यातील लिंबेजळगाव शिवारात दोन दिवसांपूर्वी चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी रात्री सुलतानपूर येथील एका शेतवस्तीवर दरोडेखारोंनी सशस्त्र दरोडा टाकून लूट केली. याप्रसंगी दरोडेखोरांनी चाकूने केलेल्या हल्ल्यात मनोहर शंकर निकम (५७) आणि त्यांची पत्नी केसरबाई (५०) हे गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने खळबळ उडाली असून, पोलिसांनी क ोम्बिंग आॅपरेशन राबवून काही संशयितांना ताब्यात घेतले आहे.सुलतानपूर शिवारातील शेतवस्तीवर राहणारे निकम कुटुंब मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे जेवण करून झोपले होते. रात्री ११.३० वाजेच्या सुमारास मनोहर निकम हे लघुशंकेसाठी उठले. दरवाजा उघडून ते घराबाहेर आले असता चिंचेच्या झाडांच्या मागे दबा धरून बसलेल्या दोन दरोडेखोरांनी त्यांच्यावर हल्ला चढविला. याप्रसंगी निकम यांनीही आरडाओरड करीत त्यांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न सुरू केला. निकम यांच्या आवाजाने त्यांची पत्नी केसरबाई झोपेतून उठल्या. पतीच्या मदतीसाठी त्या दरोडेखोरांच्या दिशेने धावल्या. यावेळी एका दरोडेखोरोने केसरबाईकडे आपला मोर्चा वळवून त्यांच्या गळ्याला धारदार चाकू लावला. काही कळण्याच्या आत त्याने केसरबाईच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावून घेतली. यावेळी केसरबाईने प्रतिकार करताच त्याने त्यांच्या डोक्यावर चाकूने वार केला. या घटनेत दोघेही पती-पत्नी गंभीर जखमी झाले. निकम यांच्या शेतवस्तीवरून आरडाओरडा ऐकू आल्यामुळे ग्रामस्थ शेतवस्तीच्या दिशेने येत असल्याची चाहूल दरोडेखोरांना लागली. त्यानंतर ते तेथून पसार झाले. गावातील लोकांनी बेशुद्धावस्थेत निकम दाम्पत्याला घाटी रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस उपयुक्त संदीप आटोळे, पोलीस उपआयुक्त वसंत परदेशी, सहायक पोलीस आयुक्त बाबाराव मुसळे, पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे, पोलीस निरीक्षक रामेश्वर थोरात, गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, सहायक निरीक्षक उन्मेष थिटे, पोहेकॉ. सुरेश काळे, श्वान पथक, ठसेतज्ज्ञांचे पथक आदींनी घटनास्थळी जाऊन दरोडेखोरांचा माग काढण्याचा प्रयत्न केला.
शेतवस्तीवर दरोडेखोरांचा धुमाकूळ
By admin | Updated: April 7, 2016 01:05 IST