औरंगाबाद : शहराचा पाणीपुरवठा महापालिकेच्या ताब्यात असून, संपूर्ण कारभार पालिकाच बघत असल्याचे मागील काही दिवसांपासून सांगण्यात येत आहे. शुक्रवारी औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीने शहराला पाणी देण्याचे काम आजही आमच्याकडेच असल्याचा धक्कादायक खुलासा दिला आहे. कंपनी आणि महापालिकेच्या वादात सर्वसामान्य नागरिकांच्या तोंडचे ‘पाणी’ पळाले आहे. शुक्रवारी ऐन दिवाळीत शहरातील अनेक वसाहतींना निर्जळीचा सामना करावा लागला.मागील तीन महिन्यांपासून औरंगाबाद महापालिका आणि युटिलिटी कंपनीत पाणीपुरवठ्याचा ताबा या मुद्यावर जोरदार न्यायालयीन लढाई सुरू आहे. चार दिवसांपूर्वीच खंडपीठाने महापालिकेच्या बाजूने निर्णय दिला. या निर्णयाला शुक्रवारी युटिलिटी कंपनीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. न्यायालयाने परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवा, असे आदेश दिले आहेत. मागील काही दिवसांपासून शहराचा पाणीपुरवठा महापालिकाच बघत आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार पाणीपुरवठा महापालिकेकडेच राहणार असल्याचा दावा विधि सल्लागार अपर्णा थेटे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे. पाणीपुरवठा आमच्याकडेचसर्वोच्च न्यायालयाकडूनही औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीला दिलासा मिळाला नाही. त्यानंतर रात्री उशिरा कंपनीचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी अविक बिस्वास यांनी प्रसिद्धीस दिलेल्या एका पत्रकात म्हटले आहे की, पाणीपुरवठ्याच्या दुरुस्तीचे काम करणारे सर्व वेंडर आजही आमच्याकडे काम करीत आहेत. ते मनपात काम करण्यास तयार नाहीत. १३९ स्क्वेअर किलोमीटरमध्ये पाणीपुरवठा कंपनीच करीत आहे. ज्या भागात नळ नाहीत, तेथे आम्हीच टँकरने पाणी देत आहोत. जायकवाडी, फारोळ्यात आमचेच कर्मचारी केमिकलचा वापर करून पाणी देत आहेत. प्रयोगशाळेतही आमचेच कर्मचारी तैनात आहेत. तब्बल २०० कर्मचारी शहराचा पाणीपुरवठा सांभाळत आहेत. गुरुवारी जायकवाडी येथील वीजपुरवठा वीज कंपनीने खंडित केला होता. थकबाकी भरल्याशिवाय वीज देणार नाही, अशी भूमिका वीज कंपनीने घेतली होती. मनपा आयुक्तांच्या मध्यस्थीनंतर कंपनीने वीजपुरवठा सुरू केला. यामुळे सिडको-हडकोशिवाय जुन्या शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला. गुरुवारी अनेक वसाहतींना पाणी देता आले नाही. शुक्रवारीही परिस्थितीत बदल झाला नव्हता. ऐन दिवाळीत नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करायची वेळ आली आहे. शनिवारी सकाळी औरंगाबादकरांना अभ्यंगस्नान करावे लागणार आहे. मनपाने पाणीच दिले नाही, तर अभ्यंगस्नान कसे करावे, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
पाण्याची पळवापळवी
By admin | Updated: October 29, 2016 01:01 IST