जालना : जलयुक्त शिवार अभियान शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. ही कामे झाल्यामुळे गावातच व परिसरात पडणाऱ्या पावसाचे पाणी त्या-त्या ठिकाणाच्या जमिनीत जिरविल्या जाणार असून, जमिनीतील पाणी पातळी वाढणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होऊन आर्थिक स्थैर्य येईल व जीवनात आपोआप क्रांती घडेल, असे मत पाटोदा ता. मंठा येथील जलयुक्त शिवार अभियानांतर्गत नदी खोलीकरण व रूंदीकरण कामाचे उदघाटन प्रसंगी राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केले.यावेळी उपविभागीय अधिकारी अरविंद लोखंडे, तहसीलदार छाया पवार, भाऊसाहेब कदम, अंकुशराव अवचार, गणेश खवणे, कैलास बोराडे, भाऊसाहेब गोरे, बी.डी. पवार, कल्याण खरात, संजय गायकवाड आदींची उपस्थिती होती.पुढे बोलताना पालकमंत्री लोणीकर म्हणाले की, जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे पाणी सिंचन करण्याची व्यवस्था नाही त्यांना पावसाच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहे. परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे गेल्या वर्षापासून पावसाळ्यात पडणाऱ्या पावसाची अनियमितता असल्यामुहे वेळेत पाऊस झाला नाही. त्यामुळे मराठवाड्यासह जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सातत्याने दुष्काळाचा सामना करावा लागत आहे.ही परिस्थिती बदलून टाकण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत विविध कामे करून ग्रामीण भागात पावसाचे पाणी जिरविण्याचा विशेष प्रयत्न केला जात आहे. याद्वारे जमिनीत पाण्याची पातळी वाढणार असून, उत्पादनातही वाढ होऊ शकेल, असेही लोणीकर यांनी नमूद केले. (प्रतिनिधी)
जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती- लोणीकर
By admin | Updated: May 19, 2015 00:46 IST