औंढा नागनाथ : येथे नव्यानेच रूजू झालेले तहसीलदार श्याम मदनूरकर यांनी अवैध वाळूचा उपसा करणाऱ्यांविरोधात कडक पावले उचललेली असून शुक्रवारी रात्री १० वाजल्यापासून शनिवारी दिवसभर वाळूची अवैध तस्करी करणारी आठ वाहने पकडून चालक -मालकांवर कारवाई करण्यात आली. तर जवळा बाजार येथे दोन ट्रॅक्टर चालकांविरोधात कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औंढा नागनाथ तालुक्यात १० ठिकाणी रेती घाटांचे लिलाव झाले आहेत. या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात पावतीविना काहीजण अवैधपणे वाळूचा उपसा करून वाहतूक करीत असल्याचे चित्र होते. याला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम यांच्या मार्गदर्शनाखाली पंधरा दिवसांपूर्वीच औंढा तहसील कार्यालयाचा पदभार घेणारे तहसीलदार श्याम मदनूरकर यांनी अवैध वाळूची तस्करी थांबविण्यासाठी तलाठी माणिक रोडगे, व्ही.व्ही. मुंडे, एम.बी. भुसावळे, गरूड यांचे पथक तयार केले होते. या पथकाने शुक्रवारी रात्री ९ ते १० च्या दरम्यान औंढा- गोळेगाव रस्त्यावरून वाळूची वाहतूक करणाऱ्या एम.एच. ४०-एन.५०, एम.एच.२९- २६१, एम.एच.३८- सी ७७४, एम.एच. २७ एक्स ४२२३ व नंबर प्लेट नसलेल्या वाहनांना थांबवून चालकांकडे विचारपूस केली असता त्यांच्याकडे असलेल्या पावत्यांवर खाडाखोड केलेली आढळून आली. त्याचप्रमाणे सिद्धेश्वर येथील रेती घाटांच्या पावत्या त्यांच्याकडे दिसून आल्या. त्यामुळे तहसीलदार मदनूरकर यांनी शंका आल्याने ४ टिप्पर व दोन ट्रॅक्टर औंढा पोलिस ठाण्यात जमा केले. तर दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी १० च्या सुमारास याच पथकाने आजरसोंडा तपोवन मार्गे जवळा बाजारकडे वाळू घेऊन येणारे दोन ट्रॅक्टर पकडले. चालकांकडे विचारणा केली असता त्यांच्याकडे कुठल्याच प्रकारची पावती आढळून आली नाही. यावेळी ट्रॅक्टरचे चालक-मालक निवृत्ती कदम व राम कदम यांनी पकडलेले ट्रॅक्टर घेऊन चालक पळून जात होते. त्यामुळे त्यांच्यावर अवैध गौणखनिजाची विना परवाना चोरी करून माल नेल्याप्रकरणी हट्टा पोलिस चौकीमध्ये तहसीलदार श्याम मदनूरकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच शनिवारी दुपारी २ वाजता नागनाथ मंदिराच्या पाठीमागून दरेगावकडे अवैध वाळू घेऊन जाणारे दोन ट्रॅक्टर पकडून पोलिस ठाण्यात जमा केले आहेत. पकडण्यात आलेल्या वाहन चालक- मालकांकडून सोमवारी अधिकृत चालनद्वारे पैसे भरून घेऊन कारवाई करण्यात येणार असल्याचे मदनूरकर यांनी सांगितले. (वार्ताहर)
८ वाहनांवर ‘महसूल’ची कारवाई
By admin | Updated: June 29, 2014 00:23 IST