मुजीब देवणीकर, औरंगाबाद शहरातील व्यापार्यांनी एलबीटी कर भरण्यास नकार दिल्याने महापालिकेची अर्थव्यवस्था प्रचंड डबघाईला आली आहे. त्यातच वेगवेगळ्या वॉर्डांमध्ये मालमत्ता, पाणीपट्टी कर वसूल करणार्या मनपाच्याच कर्मचार्यांनी बोगस पावत्या छापून नागरिकांना देण्याचा ‘कुटिर उद्योग’ सुरू केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार अनेकदा उघड झाल्यानंतर कोणत्याही वरिष्ठ अधिकार्याने संबंधितांवर कारवाई करण्याचे धाडस दाखविले नाही, हे विशेष. मनपाच्या वॉर्ड ‘फ’ कार्यालयांतर्गत व इतर काही वॉर्डांमध्ये हा बोगस उद्योग सुरू असल्याचे समोर आले आहे. वॉर्ड ‘फ’अंतर्गत मालमत्ताधारकांना देण्यात आलेल्या काही बोगस पावत्याच ‘लोकमत’प्रतिनिधींच्या हाती लागल्या आहेत. ज्या नागरिकांना या पावत्या दिल्या आहेत, त्यांच्याकडून मनपाच्या कर्मचार्यांनी रोख पैसे घेतले; पण मनपाच्या दप्तरी एक रुपयाही भरला नाही. मागील एक ते दोन वर्षांपासून हा प्रकार राजरोसपणे सुरू आहे. नागरिकांच्या रेकॉर्डवर मालमत्ता आणि पाणपट्टीची थकबाकी दिवसेंदिवस वाढतच आहे. काही नागरिकांनी वॉर्ड ‘फ’ कार्यालयात येऊन विचारणा केली की, मागील वर्षीच आम्ही टॅक्स भरला असतानाही एवढी थकबाकी कशी...? असा प्रश्न त्यांनी केला. मागील वर्षी भरलेली पावतीही नागरिकांनी सादर केली. ही पावती पाहताच वॉर्ड ‘फ’ कार्यालयातील कर्मचार्यांच्या पायाखालची वाळूच घसरली. कारण मालमत्ताधारकांना बोगस पावत्या देण्यात आल्याचे उघड झाले होते. नागरिकांची बोळवण करून इतर कर्मचार्यांनी पाठवून दिले. संगणकात बिघाड झाल्याने तुमचे रेकॉर्ड अपडेट झाले नाही, लवकरच होईल, असेही सांगण्यात आले. बोगस पावतीसंदर्भात वॉर्ड ‘फ’ कार्यालयात कोणी दिली, कोणी दिली, अशी चौकशी सुरू झाली. प्रकरण वॉर्ड अधिकारी, कर संकलकांपर्यंत पोहोचले; पण कोणत्याही वरिष्ठ अधिकार्यांनी यात घटनेचे गांभीर्य ओळखून कारवाई केली नाही. त्यामुळे बोगस पावत्या देणार्या रॅकेटचे मनोबल आणखी वाढले. त्यांनी पूर्वीच्या तुलनेत आणखी व्यापक प्रमाणात मालमत्ताकराची वसुली सुरू केली. दिवसभरातून दहा ते पंधरा नागरिकांना या पावत्या देण्याचे उद्योग आजही सुरूच आहेत. आॅनलाईन प्रक्रियेला आव्हान महापालिकेत पूर्वी मालमत्ता, पाणीपट्टी वसुलीचे सर्व रेकॉर्ड मोठमोठ्या रजिस्टरवर लिहिले जात होते. त्यात अनेकदा कर्मचारी पाने फाडून रेकॉर्डच गायब करून टाकत असत. काही वॉर्ड कार्यालयांमध्ये यापूर्वीही बोगस पावतीबुक आढळून आले होते. या सर्व प्रकाराला आळा घालण्यासाठी मनपा प्रशासनाने दोन वर्षांपूर्वी म्हणजेच २०१२ मध्ये शहरातील सर्व मालमत्ताधारकांचे रेकॉर्ड आॅनलाईन केले. त्यामुळे कोणत्याही एका संगणकातून रेकॉर्ड उडविले तरी दुसर्या संगणकात ते साठवून राहते. या संगणकीयप्रणालीवर मनपाच्या कर्मचार्यांनी मात केली आहे. बोगस संगणकीय पावत्या २०१२ मध्ये संगणकीय पावत्या तयार केल्यानंतर मनपा कर्मचार्यांनी हुबेहूब बोगस पावत्या तयार करून घेतल्या. कोणताही सर्वसामान्य नागरिक ही पावती बोगस आहे, हे सांगूच शकत नाही. कारण त्यावर पैसे स्वीकारणार्याची सही, वॉर्ड कार्यालयाचा शिक्का मारलेला असतो. मनपाचे वरिष्ठ अधिकारीही ही बोगस पावती लवकर ओळखू शकणार नाहीत; पण तांत्रिक बाबींचे ज्ञान असलेल्या कर्मचार्यांनाच ही पावती बोगस असल्याचे निदर्शनास येते. नोटिसाही बोगस वॉर्ड ‘फ’ शिवाय आणखी काही वॉर्ड कार्यालयांमधून नागरिकांना टॅक्स लावण्यासंदर्भात चक्क बोगस नोटिसा देण्यात आल्या आहेत. संगणकात टॅक्स कमी करून देणे आदी कामे मनपा कर्मचार्यांचे रॅकेट करीत आहे. हा प्रकारही करसंकलक अधिकारी शिवाजी झनझन यांच्यासमोर आल्यावर त्यांनी दोषींवर कारवाई करण्याऐवजी उलट त्यांना ‘राजाश्रय’दिला. त्यामुळे टॅक्स विभागात सुरू असलेले लाखो रुपयांचे उलटफेर कोणाच्या सांगण्यावरून होत आहेत, असा प्रश्न काही प्रामाणिक कर्मचार्यांना पडला आहे. यासंदर्भात झनझन यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.वॉर्ड ‘फ’ मधील कर्मचार्यांनी ज्या नागरिकांना ही पावती दिली होती, त्यांनी यासंदर्भात तक्रार केली. आमच्या नावावर थकबाकी कशी शिल्लक राहिली. त्यावरून बोगस पावतीचा प्रकार उघकीस आला. बोगस पावती तयार करणार्याने तांत्रिकदृष्ट्या अनेक चुका करून ठेवल्या आहेत. मनपाच्या पावतीचा क्रमांक ऋ104/3673 असा सुरू होतो. बोगस पावतीत ऋ1 च्या ऐवजी ऋक 04/58231 अशी मोठी चूक करून ठेवली. मनपाच्या पावती पुस्तकातील कॉलम, भाषा, वाक्यरचना, अशा एक नव्हे अनेक बाबींमध्ये तफावत करून ठेवली आहे.
मनपात बोगस कर वसुलीचे रॅकेट!
By admin | Updated: May 31, 2014 01:26 IST