उस्मानाबाद : शहरानजीकच्या पोहनेर रोडवरील शासकीय जागेवर अतिक्रमण करून टाकण्यात आलेला ढाबा महसूलच्या पथकाने शनिवारी कारवाई करून हटविला़ पोलीस संरक्षणात करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान काहींनी पथकातील अधिकाऱ्यांशी हुज्जत घातल्याने या प्रकरणी ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे़शहरातील नगर पालिकेच्या जमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून, पालिका प्रशासन कारवाईकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे़ याच प्रमाणे शहर व परिसरातील शासकीय जमिनींनाही अतिक्रमणाचा विळखा पडला आहे़ शहरानजीकच्या पोहनेर मार्गावरील शासकीय जागेत एका इसमाने अतिक्रमण करून धाबा टाकला होता़ ही बाब लक्षात आल्यानंतर सहाय्यक जिल्हाधिकारी तथा तहसीलदार आयुष प्रसाद, उपविभागीय अधिकारी डॉ़ चेतन गिरासे, नायब तहसीलदार राजेश जाधव, तलाठी खोत, नाईकनवरे, विकास गोरे, सुनिल कांबळे आदींच्या पथकाने शनिवारी दुपारी पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण विरोधात कारवाई केली़ ही कारवाई सुरू असताना उपस्थित काहींनी पथकातील अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली़ त्यानंतरही पथकाने मोहीम सुरूच ठेवत शासकीय जमिनीवर झालेले अतिक्रमण हटविले़ यावेळी सपोनि संग्राम जाधव यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता़ या कारवाईमुळे शासकीय जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, महसूल विभागाने कारवाईत सातत्य ठेवून शहर व परिसरातील अतिक्रमण हटवावे, अशी मागणी होत आहे़
अतिक्रमणावर महसूलचा हातोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2017 23:41 IST