बीड: आरक्षण हा मुद्दा मराठा समाजासाठी जिव्हाळ्याचा. त्यासाठी समाजातील विविध घटकांतून मागील अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलनाचा लढा उभारण्यात आला. आरक्षणासाठी ठिकठिकाणचे समाजबांधव रस्त्यावर आले. आंदोलने, लढे उभारले गेले. याची तीव्रता बीड जिल्ह्यात काकणभर जास्तच राहिली. मराठा आरक्षणाच्या लढ्याचे केंद्रबिंदू म्हणून बीडकडे पाहिले गेले. विविध संघटनांनी एकत्रित येऊन या लढ्याला आणखीनच बळ दिले. पाठोपाठ मुस्लिम बांधवांनीही आरक्षणाच्या लढ्यात उडी घेऊन त्याची तीव्रता वाढविली. बीडमधून सुरू झालेल्या आरक्षणाच्या लढ्याची फलश्रुती झाली आहे. त्यामुळे बीडकरांना त्याचा अतिशय आनंद झाला. सामाजिक न्याय दिनाच्या पूर्वसंध्येला राज्य शासनाने मराठा समाजाला १६ टक्के तर मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण जाहीर केले. त्यानंतर जिल्हाभर दिवाळी साजरी करण्यात आली. आरक्षणाने मुस्लिम व मराठा बांधवांच्या उत्कर्षाची दारे किलकिली झाली आहेत, असा सूर उमटला.मराठा समाजातील अनेक कुटुंबिय पिढ्यानपिढ्या दारिद्र्यात खितपत आहेत. अशांसाठ आरक्षणाची गरज आहे. आता शासनाने आरक्षणाचा निर्णय घेतला असला तरी हा निर्णय उशीराने घेतल्याने खंत वाटत आहे. तसेच मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण न दिल्याने विद्यार्थ्यांना केंद्राच्या परीक्षांमध्ये फायदा होईल, याची आशा वाटत नाही. निवडणुकीच्या तोंडावर हे आरक्षण दिले असल्याने अनेक शंकांना वाव आहे. - आ. विनायक मेटे, अध्यक्ष शिवसंग्राम. मराठा व मुस्लिम समाजाला १६ व ५ टक्के आरक्षण दिल्याने याचा समाजाला फायदा होईल. समतेचे प्रणेते शाहू महाराज यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला हा निर्णय घेतल्याने समाजातील सर्वच घटकांना न्याय मिळणार आहे. आरक्षणामुळे विद्यार्थ्यांने अनेक प्रश्न मार्गी लागणार आहेत. आरक्षण मिळाल्यामुळे समाजाला न्याय मिळाला आहे. शासनाचा हा निर्णय कौतुकास्पद व ऐतिहासिक आहे.- सुरेश धस, राज्यमंत्री. मराठा व मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यास शासनाकडून उशीर झाला असला तरी हा समाजाच्या हिताचा निर्णय आहे. यामुळे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात दोन्ही समाजाला न्याय मिळणारआहे. या निर्णयामुळे आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्यांना मोठा आधार मिळाला आहे. आरक्षणाचा लाभ घेऊन समाजातील मुले वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची छाप सोडतील, असा विश्वास आहे. आरक्षणाने यशाचा मार्ग मोकळा झाला आहे.- आ. अमरसिंह पंडितमराठा व मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याचा शासनाचा निर्णय योग्य आहे. या निर्णयाचा गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. आरक्षणामुळे अनेक प्रश्न सुटणार आहेत. गोरगरीब विद्यार्थ्यांवर आरक्षणाअभावी मागे पडण्याची वेळ येत होती. आता आरक्षणाने चित्र नक्कीच बदलेल. गुणवत्ता असूनही आरक्षणाअभावी स्पर्धेबाहेर फेकलेले विद्यार्थी पुढे जातील. आरक्षण जाहीर करुन आघाडी सरकारने गोरगरीबांचे हित जोपासले आहे.- आ. बदामराव पंडितमराठा आरक्षणासाठी समाजातून गेल्या अनेक वर्षापासून मागणी करण्यात येत आहे. यासाठी विविध संघटना आंदोलनही करीत आहेत. मराठा व मुस्लिम समाजातील अनेक कुटुंबियांना आरक्षणाची गरज आहे. अशांना आरक्षण देण्याची भूमिका राष्ट्रवादी-कॉँग्रेसने मांडली होती. समाजाच्या हिताचा निर्णय घेतल्याने समाधान वाटत आहे. आरक्षणाने दोन्ही समाजाला विकासाच्या प्रवाहात येण्याची संधी निर्माण झाली आहे. त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा.- आ. प्रकाश सोळंकेछत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा सामाजिक दायित्वाचा वारसा आघाडी सरकारने जोपासला आहे. मराठा व मुस्लिम समाजाला आरक्षण देऊन समाजातील दुर्बलांना या आरक्षणाच्या माध्यमातून न्याय मिळणार आहे. आघाडी सरकारचा हा निर्णय दोन्ही समाजाला उन्नतीचा महामार्ग ठरेल. या निर्णयामुळे मागासलेल्या व आर्थिकदृष्ट्या मागे असलेल्या विद्यार्थ्यांना, तरुणांना याचा फायदा होईल.- आ. पृथ्वीराज साठे मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या निर्णयास मी आठ वर्षापुर्वीच जिल्हा परिषद उपाध्यक्ष असताना सभागृहात समर्थन दिले होते. आज खऱ्या अर्थाने छत्रपती शाहु महाराजांच्या जयंती निमित्त राज्य शासनाने आरक्षणाचा निर्णय जाहिर केला ही अभिनंदनिय बाब आहे. मुस्लिम समाजातील हा शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला आहे. त्यांना आता आरक्षणामुळे मुख्य प्रवाहात येण्यास मदत होईल. मराठ व मुस्लिम समाजाला आरक्षण देणे ही काळाची गरज होती. आ. धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस, परळी मराठा समाजाने अनेक वर्षांपासून आरक्षणासाठी लढा दिला होता. मुस्लिम बाधंवांनाही आरक्षणाची आवश्यकता होती. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून का होईना सरकारने आरक्षण जाहीर केले. आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला ही चांगली बाब आहे. राज्य सरकारने आरक्षण दिल्यामुळे शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातून दूर गेलेल्यांना याचा चांगला फायदा होईल. बीड न.प.ने सर्वात प्रथम मराठा व मुस्लिम बांधवांच्या आरक्षणाचा ठराव घेतला होता. असा निर्णय घेणारी बीड न.प. ही राज्यातील पहिली नगर पालिका आहे. -डॉ. भारतभूषण क्षीरसागर, गटनेते न. प., बीडमराठा व मुस्लिम समाजाला आरक्षण दिले असले तरी यात अनेक किंतु आहेत. सरकारने ‘नरो वा कुंजरोवा’ या भूमिकेने आरक्षण दिले आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेतलेला हा निर्णय आहे. शासनाचा हा निर्णय योग्य असला तरी यामुळे समाजाची फसवणूक होऊ शकते, याची शंकाही आहे. - अॅड. लक्ष्मण पवार. आघाडी सरकारने घेतलेला आरक्षणाचा निर्णय ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा व मुस्लिम समाजाला वेगळे आरक्षण देण्यात आले आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे दोन्ही समाजातील विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. या निर्णयामुळे मराठा व मुस्लिम समाजातील वंचितांना प्रवाहात येण्याची संधी उपलब्ध झाली असल्याची प्रतिक्रिया अंबाजोगाईचे उपनगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी दिली. - राजकिशोर मोदी उपनगराध्यक्ष, अंबाजोगाई
आरक्षणामुळे वाढल्या आशा, आकांक्षा...!
By admin | Updated: June 27, 2014 00:09 IST