हणमंत गायकवाड , लातूरभोजनाबाबत अनेक त्रुटी आढळल्यामुळे एमआयडीसीतील युनिट क्र. ४ च्या वसतिगृहाचा भोजनपुरवठा असलेल्या मे. तेजल ट्रेडर्स सप्लायर्स या कंपनीला ४ मे २०१६ रोजी सहाय्यक आयुक्तांनी नोटीस पाठविली होती. मात्र कंपनीकडून काहीही खुलासा न आल्याने कंपनीचा ठेका रद्द करून फर्मचे नाव काळ्या यादीत टाकण्याची शिफारस सहाय्यक आयुक्तांनी केली होती. मात्र याच कंपनीला प्रादेशिक उपायुक्तांनी १२५ नवीन मुलींचे वसतिगृह उस्मानाबाद व १२५ नवीन मुलींचे शासकीय वसतिगृह अहमदपूर व जळकोटला भोजन पुरवठ्याचे आदेश दिले आहेत.सामाजिक न्याय विभागाचे लातूर जिल्ह्यात २० ते २२ वसतिगृहे आहेत. या वसतिगृहांसाठी नियम व अटींच्या अधीन राहून भोजन पुरवठा करण्यासाठी पुरवठाधारक कंपनीला ठेका दिला जातो. लातूरच्या अतिरिक्त एमआयडीसीतील एक हजार मुला-मुलींचे वसतिगृह आहे. युनिट क्र. १, २, ३, ४ अशी वसतिगृहे आहेत. या वसतिगृहांपैकी २०१४-१५ मध्ये मुलींचे शासकीय वसतिगृह एमआयडीसी युनिट क्र. ४ चा भोजन ठेका मे. तेजल ट्रेडर्स सप्लायर्स या कंपनीकडे होता. परंतु, भोजन पुरवठ्याबाबत अनेक त्रुटी आढळल्या. वसतिगृहाचा स्वयंपाक स्वतंत्ररित्या केला जात नव्हता. शिवाय, मुलींना भोजन वेळेवर दिले जात नव्हते, आदी त्रुटी समाजकल्याण सहाय्यक आयुक्तांच्या निदर्शनास आल्या. त्यामुळे त्यांनी सदर पुरवठाधारक कंपनीला संदर्भ क्र. ५ अन्वये नोटीस पाठवून खुलासा सादर करण्याचे आदेश दिले. परंतु, कंपनीकडून खुलासा आला नाही. त्यामुळे सहाय्यक आयुक्तांनी ठेका रद्द करण्याची व फर्मचे नाव काळ्या यादीत टाकण्याची शिफारस केली होती. मात्र याच कंपनीला आता २८ जुलै २०१६ रोजी प्रादेशिक उपायुक्तांच्या आदेशाने १२५ नवीन मुलींचे शासकीय वसतिगृह उस्मानाबाद तसेच १२५ नवीन मुलींचे शासकीय वसतिगृह अहमदपूर व जळकोट या तीन वसतिगृहांचा ठेका प्रति विद्यार्थी ४०५० प्रमाणे दिला आहे. सुनील ट्रेडर्स धुळे या कंपनीने उस्मानाबाद जिल्ह्यात भोजन पुरवठा करण्यास असमर्थता दर्शविल्यामुळे मे. तेजल ट्रेडर्स सप्लायर्स लातूर या कंपनीला भोजन पुरवठा करण्याबाबतचे आदेश देण्यात आले असल्याचेही या आदेशात म्हटले आहे. सदर आदेश तात्पुरत्या स्वरुपात असून, आदेश क्र. ३ मधील अटी व शर्ती लागू राहतील, असेही या आदेशात म्हटले आहे.
काळ्या यादीत शिफारस केलेल्या कंपनीला ठेका बहाल !
By admin | Updated: August 18, 2016 00:57 IST