सिडकोतील सूर्यवंशीनगर परिसरात विविध मूलभूत सुविधांचा अभाव असून, स्थानिक अधिकाऱ्याकडे तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या भागात पथदिवे बसविण्यात न आल्याने नागरिकांना अंधारातच चाचपडत ये-जा करावी लागत आहे. सिडको वाळूज महानगर-१ मधील गट क्र. १६४, १६५ मधून गेलेल्या मुख्य रस्त्यावर ड्रेनेजलाइन चोकअप झाल्यामुळे सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. क्रीडांगणाची दयनीय अवस्था झाली आहे. या परिसरातील गट क्रमांक १५७ व १६६ या भागातील नैसर्गिक नाल्यावरील पुलाची दुरुस्ती करण्यात यावी, खवड्या डोंगर ते नगर रोड यादरम्यान नैसर्गिक नाल्याचे अर्धवट राहिलेले बांधकाम तात्काळ पूर्ण करण्यात यावे, गट नंबर १५७ मधील विना अवाॅर्ड संपादन केलेल्या ८ गुंठे जमिनीची बाजारभावाप्रमाणे मोबदला देण्यात यावा, विकास कामे करण्यात यावीत आदी मागण्या करण्यात आल्या आहेत; पण प्रलंबित प्रश्नांकडे सिडको प्रशासन कानाडोळा करीत असल्याचा आरोप कमलसिंग सूर्यवंशी, दुगाबाई सूर्यवंशी, संजय सूर्यवंशी, संदीप नरवडे, बिजेंद्रसिंग चौधरी, विजय खैरे, भगवान गायकवाड, नवनाथ जाधव आदींनी केला आहे.
--------------------