कोरोनामुळे निवडणुका अडचणीत सापडल्या होत्या. मात्र, आता सरपंचपदाचे आरक्षण सोडत होत असल्याने गावोगावी निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे. तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींची मुदत गेल्या चार महिन्यांपूर्वी संपली आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे निवडणुका घेण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. निवडणुकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्यांची कोरोनाने चांगलीच गोची केली. निवडणुका लांबणीवर पडल्याने गावोगावचे टगे मात्र कमालीचे नाराज झाले होते. दरम्यान निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने ८ डिसेंबर रोजी २०२० ते २०२५ या काळात मुदत पूर्ण होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठीचे आरक्षण निश्चित करण्यासाठी बैठका घेण्याचे आदेश तहसील प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे तालुक्यातील १३५ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांचे आरक्षण ८ डिसेंबर रोजी निश्चित होणार आहे. कोरोनाची परिस्थिती निवळत असल्याने आयोगाने निवडणुका घेण्याच्या दृष्टीने पावले टाकावयास सुरुवात केली आहे. ग्रामपंचायतीचे प्रभाग रचना व त्यांचे आरक्षण यापूर्वीच निश्चित झालेले आहे. फक्त सरपंचपदाचे आरक्षण बाकी असल्याने त्याकडे इच्छुकांच्या नजरा लागल्या आहेत.
वैजापूरमधील १३५ सरपंचांचे आरक्षण ८ तारखेला निघणार
By | Updated: December 3, 2020 04:10 IST