लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मजलीस- ए- इत्तेहाद -उल- मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाच्या तीन नगरसेवकांनी १६ आॅक्टोबर रोजी झालेल्या मनपाच्या सर्वसाधारण सभेत अभूतपूर्व असा गोंधळ घातला. महापौरांच्या अंगावर चक्क प्लास्टिकच्या खुर्च्या भिरकावणे, सुरक्षारक्षकाला धक्काबुक्की करणे, राजदंड पळविणे आदी प्रकार केले होते. तत्कालीन महापौरांनी गोंधळी नगरसेवकांचे सभागृहातील सदस्यत्व रद्द करून त्याच्याविषयीचा अहवाल शासनाला पाठविण्याचे आदेश दिले होते. मनपा आयुक्त डी.एम. मुगळीकर यांनी तीन नगरसेवकांचा अहवाल नगरविकास विभागाकडे पाठविला आहे. या अहवालावर शासनाने हिरवा कंदिल दाखविल्यास तिन्ही नगरसेवकांचे पद रद्द होण्याची शक्यता आहे.१६ आॅक्टोबर रोजी सर्वपक्षीय नगरसेवक पाणी प्रश्नावर चर्चा करीत होते. दोन दिवसांआड पाणी ठेवावे का तीन दिवसांआड हा मुद्दा सुरू असताना एमआयएमचे काही नगरसेवक महापौरांच्या आसनासमोर आले. सुरक्षारक्षक जाधव राजदंड पकडण्यासाठी पुढे सरसावले. याचवेळी एमआयएम समर्थक तथा अपक्ष नगरसेवक अजीम अहेमद यांनी सुरक्षारक्षकाला ढकलून दिले. यापाठोपाठ शेख जफर, सय्यद मतीन सुरक्षारक्षकाच्या अंगावर धावून गेले. हा निंदनीय प्रकार पाहून महापौरांनी दोन सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले. त्यामुळे चिडलेल्या मतीन आणि जफर यांनी चक्क महापौरांच्या अंगावर खुर्च्या भिरकाल्या होत्या. महापौरांनी याप्रकरणी गोंधळी नगरसेवकांवर गुन्हे दाखल करण्याचा आदेश दिला. सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हासुद्धा दाखल करण्यात आला. त्यानंतर महापौरांच्या आदेशानुसार आयुक्तांनी गोंधळी नगरसेवकांचा सविस्तर अहवाल शासनाकडे पाठवून दिल्याचे आज सांगितले. यामध्ये अजीम अहेमद, शेख जफर, सय्यद मतीन यांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
गोंधळी नगरसेवकांचा अहवाल शासनाकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 00:21 IST