औरंगाबाद : तीन कृषी कायदे रद्द झालेच पाहिजेत, किमान हमीभाव कायदा झालाच पाहिजे, शेतकरी, शेतमजुरांच्या एकजुटीचा विजय असो, अशा घोषणा देत शहरात २६ जानेवारी रोजी किसान सभा व शेतमजूर युनियनच्यावतीने काढण्यात आलेली ट्रॅक्टर रॅली शांततेत पार पडली.
दिल्ली गेट येथून दुपारी तीनच्या दरम्यान रॅलीला सुरुवात झाली. यात ५ ट्रॅक्टर, १० चारचाकी वाहने व २० दुचाकींसह शेतकरी, शेतमजूर व कार्यकर्ते सहभागी झाले होते. अग्रभागी असलेले ट्रॅक्टर सजविण्यात आले होते. ३ कृषी कायदे करणाऱ्या केंद्र सरकारच्या विरोधात यावेळी घोषणा देण्यात आल्या. दिल्लीत शेतकरी दोन महिन्यांपासून आंदोलन करत आहेत, त्यास पाठिंबा देण्यासाठी औरंगाबादेत ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली असल्याची माहिती लाल बावटा शेतमजूर युनियनचे जिल्हाध्यक्ष तथा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय कौन्सिल सदस्य कॉ. प्रा. राम बाहेती यांनी दिली. हरचरण सिंग गुलाटी, जयमालसिंह रंधवा, मनोहर टाकसाळ, इक्बाल सिंग गिल, जकीया बेगम, सरदार हरि सिंग, नवीन ओबेराय यांनी झेंडा दाखवून रॅली सुरू केली. दिल्ली गेट, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौक, आमखास मैदान मार्गे भडकलगेट चौकात रॅली पोहोचली. येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. शेतमजूर युनियनचे जिल्हा सचिव गणेश कसबे, भाकपचे जिल्हा सचिव अशफाक सलामी, सहसचिव अभय टाकसाळ यांची यावेळी उपस्थिती होती.
दिल्ली येथे सुरू असलेल्या ट्रॅक्टर रॅलीवर जो गोळीबार करण्यात आला व अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या, लाठीमार करण्यात आला, त्याचा तीव्र निषेध करण्यात आला. गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याला आदरांजली वाहण्यात आली.
दिल्ली येथून आंदोलनात सहभागी होऊन परतलेले शेतमजूर युनियनचे फुलंब्री तालुक्याचे मोबीन बेग, इरफान शेख, किसान सभेचे सिल्लोड तालुका अध्यक्ष बाळू शिंदे, शेतमजूर युनियनचे फुलंब्री तालुका अध्यक्ष विठ्ठल आव्हाड आदींची उपस्थिती होती.
कॅप्शन
किसान सभा व शेतमजूर युनियनच्यावतीने काढण्यात आलेली ट्रॅक्टर रॅली.