छत्रपती संभाजीनगर : शासन नियमात इमारत रेषा व नियंत्रणरेषेबाबत नमूद केलेल्या अंतरानुसार सीमांकन करून घेण्याची कार्यवाही यंत्रणेकडून सुरू आहे. भूसंपादन झालेल्या प्राधिकरण हद्दीतील दहा शासकीय मालकीच्या रस्त्यांवरील तात्पुरती तसेच पक्की अतिक्रमणे नागरिकांनी स्वत:हून काढून घ्यावीत, असे आवाहन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी मंगळवारी केले.
आयुक्तांनी प्राधिकरण व सिडको झालर क्षेत्राची ऑनलाइन आढावा बैठक आयुक्तालयात घेतली. प्राधिकरण क्षेत्रात बांधकाम परवानगी घेऊनच विकास कामे करावीत, जेणेकरून भविष्यात नागरिकांची फसवणूक होणार नाही. यंत्रणांनी तत्परतेने सीमांकन पूर्ण करून अहवाल सादर करावा, असे आदेश आयुक्तांनी दिले. सिडकोचे मुख्य प्रशासक जगदीश मिनियार, सहआयुक्त देविदास टेकाळे, महानगर नियोजनकार हर्षल बाविस्कर, सहमहानगर नियोजनकार रवींद्र जायभाये, तहसीलदार सुनंदा पारवे, एमआयडीसीचे उपरचनाकार कृष्णा जाधव, सिडकोचे प्रशासक बी. एम. गायकवाड उपस्थित होते.
प्राधिकरणाच्या हद्दीतील दहा रस्ते: दौलताबाद टी पॉइंट ते वेरूळ जुना रस्ताकेम्ब्रिज शाळा ते शेंद्रा, करमाड, लाडगावबाळापूर गाव ते पांढरीगाव (धुळे सोलापूर व बीडबायपास)गेवराई ते कौडगाव (पैठण रस्ता)नगर नाका ते पंढरपूर, वाळूज, लिंबे जळगाव, सुलतानपूर, रहीमपूर (नगर रोड)ए. एस. क्लब चौक ते करोडी, खोजेवाडी, सिरसगाव ते रांजणगाव पोळ (घोटी रस्ता)करोडी ते वंजारवाडी, जंभाळा पाचपीरवाडी (धुळे सोलापूर मार्ग)ओहर ते बोरवाडी, ममनापूर (जटवाडा रस्ता)सावंगी तलाव, चौका ते बिल्डा (जळगाव रस्ता)सावंगी ते केम्ब्रिज शाळा (राज्य महामार्ग २१७)
सिडको झालर क्षेत्राचा आढावावाळूजमधील भूसंपादन, सुविधांसह सिडको झालर क्षेत्रात दिलेल्या सुविधांचा आयुक्त पापळकर यांनी आढावा घेतला. आकारण्यात येणारे शुल्क, मनुष्यबळ, सुविधांचे हस्तांतरण, जमा, विकास शुल्काचे हस्तांतरण, मंजूर- नामंजूर विकास परवानगीचा व मंजूर विकास योजना, अभिलेखाचे हस्तांतरण, एमआयडीसी लगतचा ना-नागरी विभाग, फेज-२ मधील जमिनीमध्ये वापर व विकास परवानगी, निविदाप्रक्रिया झालेले, सुरू असलेले बांधकाम प्रकल्प याबाबत त्यांनी आढावा घेतला.
मार्किंगवरून नागरिकांमध्ये अस्वस्थताकेंब्रिज चौक ते सावंगी बायपास, लाडगाव व सावंगी परिसरातील रस्ता रुंदीकरणामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढल्याने खासदार कल्याण काळे यांच्या नेतृत्वात ग्रामस्थांनी पापळकर यांची भेट घेतली. केंब्रिज चौक ते सावंगी बायपास रस्त्याच्या संदर्भात मूळ संपादित २०० फूट क्षेत्राऐवजी २३० फूट रुंदीची नवीन मार्किंग करण्यात आल्याने, अतिरिक्त १५-१५ फुटांच्या मर्यादेत नागरिकांची घरे, शेड्स येत आहेत. लाडगाव येथे ३० ते ३५ वर्षांपूर्वी बांधलेली, नमुना ८ मध्ये नोंद असलेली घरे रस्त्याच्या नव्या आराखड्यात आल्याने नागरिक भयग्रस्त आहेत. वैध मालकीच्या जागांवर जबरदस्तीने कारवाई होणार नाही. नागरिकांच्या दस्तऐवजांची पाहणी करूनच निर्णय होईल, असे आयुक्त म्हणाले.